महागाई म्हणजेच चलनवाढ ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कालांतराने वाढतात. म्हणजे ज्या वस्तू सध्या एक कोटी रुपयांना विकत घेता येतात, त्याच गोष्टी काही वर्षांनी विकत घेण्यासाठी जास्त पैसे लागतील. उदाहरणार्थ, जर चलनवाढीचा दर वार्षिक सरासरी 6 टक्के असेल तर सध्या ज्या वस्तूंची किंमत एक कोटी रुपये आहे त्यांची किंमत भविष्यात लक्षणीय वाढेल. तुमची एक कोटी रुपयांची रक्कम तेवढीच राहिली तरी तुमची पर्चेसिंग पॉवर कमी होईल.
advertisement
1 कोटी रुपयांचं घटतं मूल्य
चलनवाढीच्या 6 टक्के वार्षिक दराचा एक कोटी रुपयांवर होणारा परिणाम:
10 वर्षांनंतर: तुमच्या एक कोटी रुपयांचं सध्याचं मूल्य 55.87 लाख रुपयांपर्यंत कमी होईल. म्हणजेच पर्चेसिंग पॉवर जवळपास निम्मी होईल.
20 वर्षांनंतर: ही किंमत आणखी घसरून 31.15 लाख रुपये होईल. हे मुल्य सुरुवातीच्या पर्चेसिंग पॉवरपेक्षा एक तृतीयांशने कमी आहे.
30 वर्षांनंतर: एक कोटी रुपयांचं मुल्य 17.42 लाख रुपयांपर्यंत घसरेल. म्हणजे तुमच्या रकमेपैकी फक्त एक षष्ठांश रक्कम शिल्लक राहील.
पैशाचं मूल्य कमी का होतं?
जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा तुमच्याकडील पैसे त्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची क्षमता गमावतो. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी चहाच्या कपाची किंमत पाच रुपये होती ती आता 10 रुपये झाली आहे. काही ठिकाणी चहाचा कप 20 रुपयांनाही मिळतो. अगदी याच प्रमाणे एक कोटी रुपयांची पर्चेसिंग पॉवर देखील कालांतराने कमी होईल.
संपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आर्थिक नियोजन...
चलनवाढीच्या परिणामांचा सामना करण्याचे काही मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपण आपल्या बचतीचं संरक्षण करू शकतो आणि मूल्यही वाढवू शकतो.
स्टॉक आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करा : शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडांनी महागाईपेक्षा जास्त परतावा दिला आहे. जर मार्केटमध्ये वार्षिक 10 टक्क्यांनी वाढ झाली तर तुमचे एक कोटी रुपये 10 वर्षांत अंदाजे 2.59 कोटी रुपये, 20 वर्षांत 6.73 कोटी रुपये आणि 30 वर्षांत 17.45 कोटी रुपये होऊ शकतात.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा : मालमत्तेच्या किमती कालांतराने वाढतात. त्यातून भाड्याच्या माध्यमातून उत्पन्न देखील देऊ शकतात. रिअल इस्टेट मार्केटमध्ये देखील शेअर मार्केटप्रमाणे चढ-उतार असतात.
सोनं आणि इतर वस्तूंमध्ये गुंतवणूक करा : महागाईच्या काळात सोनं ही सुरक्षित मालमत्ता मानली जाते. अनेकदा चलनवाढीसह त्याचं मूल्य वाढतं. म्हणून महागाईचा सामना करण्यासाठी सोनं हा लोकप्रिय पर्याय आहे.
महागाई-संरक्षित गुंतवणूक निवडा : पारंपरिक मुदत ठेवी आणि बाँड्स महागाईवर मात करू शकत नाहीत. पण, काही सरकारी बाँड्स महागाई-संबंधित परतावा देतात आणि वाढत्या किमतींच्या प्रभावाला आळा घालतात.
भारतातील महागाईची स्थिती
भारतातील सध्याचा महागाई दर सुमारे 6.4 टक्के आहे. हा दर सरकारच्या 4 ते 6 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती महागाईला बळ देत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेऊन तुम्ही तुमच्या मालमत्तेचं महागाईपासून संरक्षण करू शकता.
तुम्ही तुमच्याकडे रोख एक कोटी रुपये ठेवले तर त्यावर महागाईचा परिणाम होऊ शकतो. त्याची पर्चेसिंग पॉवर 10, 20 किंवा 30 वर्षांत कमी होईल. त्यामुळे महागाईवर मात करण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी स्टॉक, रिअल इस्टेट किंवा सोन्यासारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा. आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.