प्लास्टिकमुळे वाढत जाणारे प्रदूषण थांबवण्यासाठी पर्याय म्हणून कापडी बॅग्स अधिक उपयुक्त ठरू शकतात या विचारातून पौर्णिमा ठाकूर यांनी व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला केवळ चार कापडी बॅग्सपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका यशस्वी ब्रँडपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्याकडे 10 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या आकर्षक डिझाइनच्या कापडी बॅग्स उपलब्ध आहेत. या बॅग्सना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आज लोक दूरदूरून या बॅग्स खरेदीसाठी येतात.
advertisement
व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्या दिवसाला साधारण 400 ते 500 रुपये कमवत होत्या. मात्र सातत्य, मेहनत आणि ग्राहकांचा वाढता विश्वास यामुळे आज त्या दिवसाला 2 ते 2.5 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत. या प्रवासात अनेक अडचणी आल्या मात्र त्यांनी हार मानली नाही. विशेष म्हणजे या व्यवसायात त्यांना त्यांच्या लेकींची मोलाची साथ लाभली. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच हा व्यवसाय अधिक बळकट झाल्याचे त्या सांगतात.
पौर्णिमा ठाकूर आज इतर महिलांनाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन करत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा, यश नक्की मिळते, असा त्यांचा संदेश आहे. तसेच त्या कापडी बॅग्स होलसेल दरातही विक्री करतात. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी त्यांच्याकडून बॅग्स घेऊन पुढे विक्री करू शकतात. पर्यावरण रक्षणासोबतच स्वावलंबनाचा आदर्श घालून देणारा पौर्णिमा ठाकूर यांचा हा व्यवसाय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.