Success Story : जिद्द लागते...! ऑस्ट्रेलिया रिटर्न पुष्करने नोकरी करत सुरू केला कॅफे, सकाळी ऑफिस अन् संध्याकाळी मालक!
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
ऑस्ट्रेलियातून उच्च शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतलेल्या पुष्कर चोरडिया या तरुणाने नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा रोड साईड व्यवसाय सुरू केला आहे.
नाशिक: जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर कोणतेही काम छोटे नसते, हे नाशिकच्या एका तरुण आर्किटेक्टने सिद्ध करून दाखवले आहे. ऑस्ट्रेलियातून उच्च शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतलेल्या पुष्कर चोरडिया या तरुणाने नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा रोड साईड व्यवसाय सुरू केला आहे. आज तो दिवसा नोकरी आणि सायंकाळी आपला व्यवसाय सांभाळून महिन्याकाठी 50 हजार रुपयांहून अधिक उलाढाल करत आहे.
परदेशातील सुखाचा त्याग आणि स्वदेशी व्यवसायाचे स्वप्न
पुष्कर चोरडिया याने आर्किटेक्चरमधील पदव्युत्तर शिक्षण (Masters) ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले. परदेशात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असतानाही, त्याचे मन तिथे रमले नाही. आपल्या मातृभूमीत परत येऊन काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर घरच्यांच्या संमतीने तो नाशिकला परतला आणि एका नामांकित कंपनीत आर्किटेक्ट म्हणून नोकरीला लागला.
advertisement
'मे, तुम और चाय'ची सुरुवात
नोकरी करत असतानाच काहीतरी स्वतःचे असावे या विचारातून त्याने त्याची मैत्रीण सुकन्या हिच्या सोबतीने 'मे, तुम और चाय' या संकल्पनेवर आधारित एका मिनी रोड कॅफेची सुरुवात केली. साधारण वर्षभरापूर्वी सुरू झालेला हा प्रवास सोपा नव्हता. काही काळानंतर सुकन्याला वैयक्तिक कारणास्तव या व्यवसायातून बाहेर पडावे लागले. मात्र, पुष्कर डगमगला नाही. त्याने आपला व्यवसाय सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार केला.
advertisement
मैत्रीची साथ आणि यशाची भरारी
व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी पुष्करने आपला जवळचा मित्र शुभम आणि त्याची बहीण याना सोबत घेतले. शुभम स्वतः एका कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. आता हे तिघे आपली दिवसभराची कॉर्पोरेट नोकरी संपवून सायंकाळी पूर्ण जोशात हा कॅफे चालवतात. नाशिककरांचा या मिनी कॅफेला मोठा प्रतिसाद मिळत असून, यातून होणारी आर्थिक प्रगती कौतुकास्पद आहे.
advertisement
नोकरीच्या पगारातून केवळ गरजा पूर्ण होतात, पण व्यवसायामुळे मी माझी स्वप्ने पूर्ण करू शकत आहे, असा विश्वास पुष्कर चोरडिया व्यक्त करतो. आजचा तरुण नोकरीच्या मागे धावत असताना, उच्चशिक्षित असूनही रस्त्यावर चहाचा स्टॉल लावून सन्मानाने जगणाऱ्या पुष्करचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 8:22 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : जिद्द लागते...! ऑस्ट्रेलिया रिटर्न पुष्करने नोकरी करत सुरू केला कॅफे, सकाळी ऑफिस अन् संध्याकाळी मालक!










