मध्य प्रदेशातील चिकलाना गावात पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आणि त्यात कुख्यात तस्कर दिलावर पठाण ऊर्फ लाला याच्या घरात चक्क 'एमडी ड्रग्ज' (MD Drugs) बनवण्याचा कारखानाच उघडकीस आला आहे.
पोलिसांनी जेव्हा या घरावर छापा टाकला, तेव्हा तिथे जे सापडलं ते पाहून अधिकारीही थक्क झाले. या छाप्यात केवळ ड्रग्जच नाही, तर गुन्हेगारीचं एक मोठं जाळं समोर आलं आहे. सुमारे 10 किलो 900 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 3 कोटी रुपयांचे केमिकल जप्त करण्यात आले आहे. 91 जिवंत काडतुसे आणि 12 बोअरच्या 2 बंदुका सापडल्या आहेत.
advertisement
वन्यजीव आणि मौल्यवान वस्तू:
घरातून दोन जिवंत मोर आणि चंदनाच्या झाडांची लाकडेही जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत तब्बल 15 कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.
दिलावर लालाची दहशत आणि राजकीय कनेक्शन
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिलावर लालाचा गावात प्रचंड दबदबा आणि धाक होता. व्याजाने पैसे देऊन त्याने लोकांच्या शेकडो एकर जमिनी बळकावल्या होत्या. जो कोणी त्याच्या विरोधात बोलायचा, त्याला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी तो द्यायचा. विशेष म्हणजे, दिलावर पठाण हा केवळ गुन्हेगार नसून त्याचे राजकीय धागेदोरेही समोर आले आहेत.
त्याने 2023 ची विधानसभा निवडणूक जावरा मतदारसंघातून 'आझाद समाज पक्षा'च्या तिकिटावर लढवली होती. त्याच्या घराबाहेर 'पत्रकार' आणि 'युवजन समाज जिल्हाध्यक्ष' अशा नावाच्या पाट्या लावलेल्या होत्या, जेणेकरून कोणालाही त्याच्या काळ्या धंद्यांचा संशय येऊ नये.
हा कारखाना इतका मोठा होता की, कारवाईसाठी 5 पोलीस ठाण्यांतील 50 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) घटनास्थळी तळ ठोकून आहेत. घरात जिवंत मोर आणि चंदनाची लाकडे सापडल्याने आता वनविभागालाही पाचारण करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या कारखान्यातून तयार होणारे एमडी ड्रग्ज इंदूर, भोपाळ आणि थेट गोव्यापर्यंत सप्लाय केले जात होते. अटक केलेल्या 16 आरोपींमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे, या संपूर्ण 'ड्रग्ज रॅकेट'चा मास्टरमाइंड दिलावर पठाणच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय वरदहस्त आणि समाजसेवेचा बुरखा ओढून दिलावर लालाने ड्रग्जचे जे साम्राज्य उभे केले होते, ते आता पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. मात्र, ग्रामीण भागात अशा प्रकारे ड्रग्जचे कारखाने सुरू असणे, हे समाजासाठी एक मोठे धोक्याचे लक्षण आहे.
