राजश्री कोंढरे यांचं मूळ शिक्षण एमएससी केमिस्ट्रीचं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुमारे आठ वर्ष केमिकल क्षेत्रात काम केलं. टाटा केमिकल्समध्ये रिसर्चर म्हणून कार्यरत असताना त्यांना वार्षिक 10 लाख रुपयांचं पॅकेज मिळत होतं. करिअरच्या शिखरावर असतानाच आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा आला. मुलगी झाल्यानंतर कुटुंबासाठी अधिक वेळ देण्याची आणि स्वतःचं काहीतरी उभं करण्याची इच्छा त्यांच्या मनात बळावली. तेव्हाच त्यांनी नोकरीचा राजीनामा देत व्यवसाय करण्याचा ठाम निर्णय घेतला.
advertisement
बन-पाव अन् बोंबील फ्राय, इराणी कॅन्टीनमध्ये चवींचा खजिना, 100 हून अधिक पदार्थांचा घ्या आस्वाद
घराच्या पार्किंगची जागा रिनोव्हेट करून राजश्री यांनी कर्वेनगर परिसरात टंगस्टन कॅफेची सुरुवात केली. सुरुवातीला फूड बिझनेसचा कोणताही अनुभव नव्हता. सँडविच, पिझ्झा, पुलाव, चहा, कॉफी असे पदार्थ बनवता येत नव्हते. मात्र त्यांनी भीतीवर मात करत कुककडून सगळं शिकून घेतलं. सातत्य, मेहनत आणि शिकण्याची तयारी यामुळे आज त्या स्वतः कॅफेमधील सर्व पदार्थ तयार करतात.
केमिकल क्षेत्रातून थेट फूड इंडस्ट्रीमध्ये येताना सुरुवातीला भीती वाटत होती, असं राजश्री कोंढरे सांगतात. मात्र काहीतरी स्वतःचं करायचं हा विचार मनात पक्का असल्याने त्या निर्णयावर ठाम राहिल्या. या प्रवासात त्यांना कुटुंबाचा मोठा पाठिंबा मिळाला. विशेषतः पतींची इच्छा होती की आपला स्वतःचा फूड बिझनेस असावा, ज्यामुळे त्यांना आणखी बळ मिळालं.
आज टंगस्टन कॅफेला परिसरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर्जेदार चव, घरगुती पद्धतीने तयार केलेले पदार्थ आणि आपुलकीची सेवा यामुळे कॅफेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. राजश्री कोंढरे यांची ही यशोगाथा नोकरी आणि व्यवसाय यांच्यात संभ्रमात असलेल्या अनेक नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.