सांगली : पतीच्या निधनानंतर खचून न जाता जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अनिता पाटील यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलानेही स्वतःची जबाबदारी ओळखत आईच्या मदतीने व्यवसाय सुरू केला. मेहनतीने व्यवसाय सांभाळत पाटील माय-लेक आर्थिक उभारी घेत आहेत. नेर्ले गावच्या पाटील माय-लेकराचा संघर्षमय प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतो आहे.
अनिता महादेव पाटील आणि त्यांचा मुलगा प्रतीक हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नेर्ले गावचे रहिवासी आहेत. आठ वर्षांपूर्वी महादेव पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अनिता यांच्यावर आली. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अनिता पाटील यांनी स्वतःच्या एक एकर शेतीसह इतरांच्या शेतात रोजंदारी देखील केली. मुलीचे आणि मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न या जबाबदाऱ्या देखील पार पाडला.
advertisement
हातामध्ये पाना अन् हातोडा घेऊन ती करतीय मेकॅनिकगिरी, पाहा फरहिद शेख यांची प्रेरणादायी कहाणी
मजुरीतून सुरू झाला प्रवास
अनिता यांच्याकडे स्वतःची एक एकर शेती असल्याने त्यांना उदरनिर्वाहासाठी इतरांच्या शेतामध्ये मजुरी करावी लागली. मुलीला बारावीपर्यंतचे शिक्षण देऊन मुलीचे लग्न केले. मुलास बारावीनंतर आयटीआयचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले. यासह त्याने ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केले. हा प्रवास तितका सोपा नव्हता. परंतु खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीस धाडसाने तोंड देत त्यांनी दिवस काढले.
नोकराच्या मागे न लागता निवडला व्यवसाय
अनिता यांच्या मुलास आयटीआय वरती शहरामध्ये नोकरी मिळत होती. परंतु वयाच्या अवघ्या चौदांव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवल्याने प्रतीक यास जबाबदारीची नेमकी जाणीव होती. अशातच लहान वयापासूनच आईला हातभार म्हणून प्रतीक हायवे लगतच्या हॉटेलमध्ये वेटर बॉयचे काम करत होते. वेटर म्हणून काम करताना हॉटेल व्यवसायाची प्रेरणा मिळाल्याचे नव उद्योजक प्रतीक पाटील यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. त्यांनी पुढे सांगितल्याप्रमाणे मी जर नोकरीचा मार्ग निवडला असता तर आईला एकटीला सोडून मला शहरात राहावे लागले असते. त्यातही पंधरा-वीस हजार महिन्याचा पगार असता. परंतु आईला सोबत घेऊन व्यवसाय सुरू केल्याने आम्ही इडली- उडीद वड्याच्या विक्रीतून दरमहा 50 ते 60 हजारांचा नफा कमवत आहोत.
आलेल्या परिस्थितीवर जिद्दीने मात करत, पाटील माय- लेकराने इडली- उडीद वडा व्यवसायात यशस्वी वाटचाल केली आहे. वेळ कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही अन् कष्टाने कमावण्यास संकोच बाळगायचा नाही. हाच संदेश अनेक तरुणांना आणि एकल महिलांना नव्या ऊर्जेने उभे राहण्याची प्रेरणा देतोय.