सोलापूर : अनेक उच्चशिक्षित तरुण हाताला काम मिळत नाही म्हणून निराशेचे जीवन जगत असतात. पण सोलापूर शहरातील एका तरुणाने अनोखा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून सर्व खर्च वजा करून तो चांगली कमाई करतोय. बी.ई. मेकॅनिकल झालेल्या महेश हिरेपट या तरुणाने चक्क बॅटरी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय कधी सुरू केला? ही कल्पना कशी सुचली? हेच आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
advertisement
सोलापुरातील कल्याण नगर होटगी रोड भागात राहणारा महेश हिरेपट याचं बी.ई. मेकॅनिकल पर्यंत शिक्षण झालं. 2018 मध्ये बी.ए मेकॅनिकल पूर्ण झाल्यानंतर महेशनं एका खासगी कंपनीत काम केलं. 2020 साली कोरोना काळात त्यांना कामावरून कमी करण्यात आले. काम सुटल्यावर पुढे काय करायचं? हा विचार महेश सतत करत होता. मग त्याला एक व्यवसाय सुचला आणि त्यानं तोच करण्याचा निर्णय घेतला.
फक्त 6 हजारांचा खर्च, 20 वर्षांपासून मोफत गॅस, शेतकऱ्यानं कशी लढवली शक्कल?
लॉकडाऊनमध्ये महेशने बॅटरी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये महेश कडे 5 ते 10 ग्राहक होते. त्यातूनही लॉकडाऊन आणि व्यवसायिकांवर वेळेचे निर्बंध असं संकट होतं. त्यामुळे व्यावसायिक फारसे बॅटरी भाड्याने घेत नव्हते. तरीही महेशने हार मानली नाही. त्यांनी दोन वर्ष हा व्यवसाय तसाच सुरू ठेवला. आता गेल्या चार वर्षापासून एकही सुट्टी न घेता तो व्यापाऱ्यांना बॅटरी भाड्याने देण्याचं काम करतोय.
आता महेश जवळ 200 बॅटरी असून 50 ग्राहक आहेत. गेल्या चार वर्षापासून महेश 50 जणांना बॅटरी भाड्याने देत आहेत. बॅटरीच्या ॲम्पियरनुसार भाडं ठरतं. 7 ॲम्पियरची बॅटरी आणि एक एलईडी लाईटचा एका दिवसाला 20 रूपये दर आहे. 14 ॲम्पियर बॅटरीला एका दिवसाला 30 रुपये, तर 40 ॲम्पियरच्या बॅटरीला एका दिवसाला 40 रुपये भाडे आहे. ही बॅटरी रस्त्याच्या कडेला भाजी विकणारे, फुलं विकणारे, चायनीज कॉर्नर, भजी विकणारे भाड्याने घेतात.
कोणतीही नवी गोष्ट किंवा नवीन व्यवसाय सुरू करायच म्हटल्यावर अडचणी आणि वेगवेगळ्या समस्या येतच असतात. तरीदेखील तरुणांनी निराश न होता कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता जर व्यवसाय केला तर नक्कीच यश मिळेल, असा सल्ला महेश हिरेपटने दिला आहे.