मुंबई: आज शेअर बाजारात मोठ्या हालचाली होण्याच्या अंदाज आहे. आज सोमवार (22 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजाराचे आयटी सेक्टरमधील स्टॉक्सवर लक्ष असणार आहे. अमेरिकेने एच-1बी व्हिसा शुल्क वाढवले आहे. गेल्या आठवड्यात निफ्टी आयटी निर्देशांकात 1 ते 3 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. तर, दुसरीकडे शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर काही घडामोडी घडल्या आहेत. त्याचा परिणाम ही काही स्टॉक्सवर होणार आहे. त्याशिवाय, आजपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याने संबंधित स्टॉक्सकडे बाजाराचे लक्ष असणार आहे.
advertisement
आयटी स्टॉक्सचे काय होणार?
ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसा कार्यक्रमात ऐतिहासिक बदल केले आहेत, व्हिसा शुल्कात एक लाख डॉलर्सपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिका ही भारतीय आयटी क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. मात्र, व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे की व्हिसासाठी आकारण्यात येणारे एक लाख डॉलर्स हे शुल्क अर्जदारांना एकदाच भरावी लागणार आहे.
या स्टॉक्सवरही राहणार नजर..
हरिओम पाईप: कंपनीने गडचिरोलीमध्ये स्टील प्लांट स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे. हरीओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडने (एचपीआयएल) गडचिरोली जिल्ह्यात एकात्मिक स्टील प्लांट स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे, असे कंपनीने एक्सचेंजला कळवले आहे. कंपनी या प्रकल्पात एकूण 3135 कोटींची गुंतवणूक करेल. शुक्रवारी हरिओम पाईपचे शेअर्स 2.68 टक्क्यांनी वधारून 555 रुपयांवर बंद झाले.
अदानी ग्रीन: कंपनीने अक्षय ऊर्जा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अदानी इकोजेन वन लिमिटेड आणि अदानी इकोजेन टू लिमिटेड या दोन नवीन उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. कंपनीने एक्सचेंजला माहिती दिली की, कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या अदानी रिन्यूएबल एनर्जी होल्डिंग इलेव्हन लिमिटेड (AREH11L) ने 19 सप्टेंबर 2025 रोजी दोन नवीन पूर्ण मालकीच्या उपकंपनींचा समावेश केला आहे.
पीएनसी इन्फ्राटेक: कंपनीने बिहार राज्य रस्ते विकास महामंडळ (BSRDC) कडून 495.54 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाचा एक उच्च-स्तरीय पूल आणि अप्रोच रोड प्रकल्प मिळवला आहे. कंपनीने सांगितले की हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल. एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, 19 सप्टेंबर 2025 रोजी बिहार राज्य रस्ते विकास महामंडळ (BSRDC) कडून त्यांना स्वीकृती पत्र (LOA) मिळाले.
गार्डन रीच शिपबिल्डर्स: कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले की, त्यांना चार हायब्रिड बहुउद्देशीय जहाजे बांधण्यासाठी जर्मन-आधारित कंपनीकडून कंत्राट मिळाले आहे. करारात या जहाजांचे डिझाइन, बांधकाम आणि वितरण समाविष्ट आहे. ही ऑर्डर 33 ते 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या चारही जहाजांच्या बांधकामासाठी ऑर्डर आकार $62.4 दशलक्ष आहे. ही जहाजे 120 मीटर लांब आणि 17 मीटर रुंद असतील आणि एका वेळी 7500 मेट्रिक टन माल वाहून नेण्यास सक्षम असतील.
पिरामल एंटरप्रायझेस: पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेडचे (PEL) पिरामल फायनान्स लिमिटेड (PFL) मध्ये विलीनीकरण 23 सप्टेंबरपासून प्रभावी होईल. कंपनीने शनिवारी एका नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की 23 सप्टेंबर 2025 ही विक्रमी तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपासून पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेडच्या शेअर्सचा स्टॉक एक्सचेंजवर व्यापार बंद होईल.
हुडको: गृहनिर्माण आणि शहरी विकास महामंडळ लिमिटेड (हुडको) ने देशभरातील चार बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी NBCC (इंडिया) लिमिटेड सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे हुडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) संजय कुलश्रेष्ठ आणि एनबीसीसीचे सीएमडी के. पी. महादेव स्वामी यांनी दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारांतर्गत प्रकल्प उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि दिल्लीमध्ये राबविले जातील.
ट्रायडेंट लिमिटेड: जीएसटी अधिकाऱ्यांनी 2028-19 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांसाठी 518.66 कोटींची कर मागणी प्रक्रिया रद्द केल्याने कंपनीला दिलासा मिळाला. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 0.94 टक्क्यांनी वाढून 30.12 रुपयांवर वर बंद झाले.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया: कंपनीने बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल सोबत सामंजस्य करार केले आहेत. या सहकार्याचा उद्देश स्वावलंबी भारताच्या मोहिमेत सहभाग, भारताची शिपिंग क्षमता मजबूत करणे आणि देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवणे आहे.
लुपिन: यूएस एफडीएने कंपनीच्या पुणे बायोटेक सुविधेवर पूर्व-मंजुरी तपासणी पूर्ण केली आणि चार आक्षेप जारी केले. कंपनीने सांगितले की ते या आक्षेपांचे निराकरण वेळेत करून यूएस एफडीएला प्रतिसाद देईल. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 0.51 टक्क्यांनी वधारत 2057 रुपयांवर बंद झाले.
जीआरएसई: सागरी अमृत काल व्हिजन 2047 अंतर्गत भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षा वाढविण्यासाठी कंपनीने जहाजबांधणी, बंदर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारांसोबत पाच सामंजस्य करार केले.