येत्या १ एप्रिलपासून देशातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेस होणार आहेत. म्हणजेच, आता टोल भरण्यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी या मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. नवीन नियमानुसार, टोल नाक्यावर आता फक्त दोनच पर्यायांनी टॅक्स भरता येईल. फास्टॅग वाहनाच्या काचेवर असलेल्या फास्टॅगद्वारे स्वयंचलित कपात किंवा दुसरा पर्याय UPI पेमेंट, जर फास्टॅगमध्ये तांत्रिक अडचण आली, तर स्कॅनरद्वारे युपीआय पेमेंट करता येणार आहे.
advertisement
सध्या फास्टॅग अनिवार्य असूनही अनेक वाहनचालक रोख रकमेने टोल भरतात. सुट्या पैशांच्या देवाणघेवाणीत वेळ जातो आणि मागे वाहनांच्या रांगा लागतात. रोख व्यवहार पूर्णपणे बंद केल्यामुळे गाड्यांना टोल बूथवर थांबावे लागणार नाही, परिणामी प्रवासाचा वेळ वाचेल आणि वारंवार गाडी थांबवून सुरू करावी लागत नसल्याने इंधनाचीही मोठी बचत होईल.
सरकार सध्या देशातील २५ टोल प्लाझावर नो-स्टॉप प्रणालीची चाचणी घेत आहे. हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास भविष्यात महामार्गावर कोणतेही अडथळे नसतील. हाय-स्पीड कॅमेरे आणि सेन्सर्स धावत्या गाडीचा टोल आपोआप कापतील. १ एप्रिलचा हा निर्णय याच 'बॅरियर-मुक्त' टोलिंगच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.
तुमच्या फास्टॅग खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करा इमर्जन्सीच्या वेळी UPI पेमेंटसाठी मोबाईलमध्ये इंटरनेट आणि अॅप सक्रिय ठेवा. १ एप्रिलनंतर जर तुमच्याकडे डिजिटल पेमेंटची सोय नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा टोल नाक्यावरून परत पाठवले जाऊ शकते.
