शेअर मार्केट विश्लेषकांचं मत आहे की, फेडरल बँकेच्या व्याजदर कपातीमुळे भारतासह जगभरातील शेअर मार्केटमध्ये तेजी येऊ शकते. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेतील सरकारी बाँडच्या व्याजदरावर देखील होईल. बाँडचे व्याजदर कमी होतील. असं झाल्यास, गुंतवणूकदार आपले पैसे बाँडमध्ये गुंतवण्याऐवजी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतील. कमी व्याजदरामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये परकीय गुंतवणूक वाढू शकते. याशिवाय, यामुळे इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांवरही व्याजदर कपातीसाठी दबाव वाढेल. भारतातही रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे.
advertisement
आरबीआय देखील व्याजदर कमी करणार का?
मनीकंट्रोलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केल्यामुळे आता सर्वांचं लक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) भूमिकेकडे आहे. एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांच्या मते, अन्नधान्यातील चलनवाढीच्या अनिश्चिततेमुळे पॉलिसी रेटमध्ये कपात होण्याची शक्यता फारच कमी आहे. आरबीआयने आठ वेळा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याआधी, फेब्रुवारी 2023 मध्ये शेवटची वाढ करून रेपो रेट 6.5 टक्के करण्यात आला होता. कोरोना महामारीच्या काळात, 27 मार्च 2020 रोजी रेपो रेट 5.15 टक्क्यांवरून 4.40 टक्के आणि नंतर 22 मे 2020 रोजी 4 टक्के करण्यात आला होता.
शेअर मार्केटवर काय परिणाम होईल?
यूएस फेडरल बँकेच्या या निर्णयाचा भारतीय शेअर मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. थोड्याच दिवसात भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजी येऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. पण, व्याजदरातील मोठी कपात अर्थव्यवस्थेशी संबंधित चिंता वाढत असल्याचं लक्षण आहे. अशा परिस्थितीत फेडरलच्या निर्णयानंतर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी बघायला मिळू शकतात.
