लग्नासाठी अनेक वर्षे होऊनही अनेक दाम्पत्यांना बाळ होत नाही. यांच्यासाठी आशेचा नवा किरण आता निर्माण झाला आहे. खरंतर, IVF प्रकिया ही गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात आहे. परंतु ती प्रक्रिया फारच खर्चिक असल्यामुळे तिचा वापर सामान्य नागरिक किंवा अल्प उत्पन्न गटातील कुटुंब करत नव्हते. परंतु आता सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमीच म्हणता येईल. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांनाही आता मुंबईत येऊन या प्रगत उपचारांचा लाभ घेता येणार आहे. रुग्णालयाच्या IVF प्रयोगशाळेत यशस्वीपणे भ्रूण निर्मिती करण्यात आली असून, अशी कामगिरी करणारे हे महाराष्ट्रातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.
advertisement
कामा हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया कमी खर्चिक आणि परवडणाऱ्या दरात होणार आहे. नोव्हेंबर 2025 पासून ही प्रक्रिया या रुग्णालयात केली जात आहे. एआरटी (आसिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नोलॉजी) या तंत्रज्ञानाचा वापर करत ही सुविधा वापरली जात आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये या रुग्णालयाला एआरटी बँक स्थापन करण्याची मान्यता मिळाली होती. आता येथे दुसर्या टप्प्यातील अत्याधुनिक सेवाही सुरू झाली आहेत. या हॉस्पिटलच्या केंद्रात IVF आणि ICSI यांसारख्या आधुनिक उपचार पद्धती देखील उपलब्ध आहे. या केंद्रावर गरजूंना डोनर स्पर्म (शुक्राणू) आणि डोनर एग (अंडाणू) यांची सुविधा सुद्धा मिळेल. अंडाणू आणि शुक्राणूच्या सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी 'क्रायोपिझवेंशन' नावाची सोय सुद्धा करण्यात आली आहे. या सरकारी रुग्णालायत खासगी रुग्णालयात लागणारा लाखोंचा खर्च होणार नाही, सरकारी रुग्णालायत कमी दरात उपचार केले जाणार आहेत.
कशी होते प्रक्रिया?
प्रक्रियेबद्दल रुग्णालायाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी असे सांगितले की, सर्वात आधी तपासणी केली जाते. अंडाशय किंवा फॅलोपियन ट्यूबमधील अडथळे औषधोपचार करून ते दूर केले जातात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होणे शक्यता असते. नैसर्गिकरीत्या यश न मिळाल्यास IVF प्रकिया राबवली जाते. यात प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून तो महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो, ज्याला सर्वसामान्य भाषेत 'टेस्ट ट्यूब बेबी' म्हटले जाते.
