बदलापूर शाळेतली दोन चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. आज तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना जीपमध्ये अक्षयचा एन्काउंटर करण्यात आला. पण अक्षयचा एन्काउंटर करण्याआधी त्याच्या आई-वडिलांनी 3 वाजेच्या सुमारास जेलमध्ये भेट घेतली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना अक्षयच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली.
अक्षय शिंदेच्या वडिलांचा प्रतिक्रिया
'माझ्या मुलावर आरोप खोटे आहे. माझ्या मुलाला पैसे देऊन ठार मारलं आहे. मी अक्षयला ३.३० वाजता जेलमध्ये भेटलो होतो. त्याला रंगाच्या पिचकरी सुद्धा कशी वापरायची ते माहिती नव्हती. पोलीस लोकांची बंदुक घेऊन कशी फायरिंग करणार. फटाके सुद्धा तो फोडत नव्हता. आम्हाला पोलिसांनी काहीच सांगितलं नाही. आम्हीच न्यूज चॅनलवर पाहतोय' अशी प्रतिक्रिया अक्षयच्या वडिलांनी दिली.
advertisement
अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया
'अक्षय शिंदेला का घेऊन येत नाही, असं पोलीस विचारत होते, अक्षयला पाहिलं तर पोलीस त्याला मारून टाकतील. त्याला इथं घेऊन यायला पोलीस लागत आहे. त्याच्या रेकॉर्ड मोठा झाला आहे. असं पोलीस बोलत होते. मी माझ्या पोरासोबत बोलेले होते, 'माझं आरोपपत्र आलंय का, मला कधी सोडणार' असं तो विचारत होता. मी त्याला बोलले, 'थोड थांब'. त्याच्या हातामध्ये काही तरी कागद सुद्धा लिहून दिला होता. 'मम्मी हे काय आहे?' तो असं कागद दाखवत होता. आम्हाला काही वाचता लिहिता येत नाही. आमच्या पोराला पैसे देऊन ठार मारलं आहे. माझ्या पोराची भरपाई द्या, नाहीतर आम्ही सुद्धा तिथे येतो आम्हालाही गोळ्या मारा. आम्ही पण मरायला तयार आहे' अशी प्रतिक्रिया अक्षयच्या आईने दिली.
तसंच, 'पोरगं माझं कधी फटाके सुद्धा फोडत नव्हता. घरातून सुद्धा आम्हाला हाकलून दिलं आहे. स्टेशनवर आम्ही राहतोय. माझा पोरगा असा करूच शकत नाही. शाळेमध्ये दुसरं कुणी तरी केलं आहे. त्याच्यावर आरोप टाकला आहे. 12 आणि 13 तारखेपासून शाळेतील लोकांना माहिती होतं. माझं पोरगं १७ तारखेला शाळेत गेला होता. हे जर माहिती असता तर तो शाळेत गेला नसता. माझं पोरगं गरीब गाय आहे. त्याला अशा कोणत्याही सवयी नाही. पोलीस काहीही म्हणतील, पोरगं माझं फटाके सुद्धा फोडत नव्हता. गाड्यांना सुद्धा घाबरत होता. आता आम्हाला सुद्धा गोळ्या टाकून ठार मारून टाका. आम्ही पण मरणार त्याच्यासोबत. आम्ही एक टाईमाचं कमावून खाणारे लोक आहोत. शाळेत बायका पोरं आहे जे पळून गेले, त्यांना का काही करत नाही' असंही त्याची आई म्हणाली.
