एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच भिवंडीमधील एका तरुणाने पाकिस्तानचं समर्थन केलं होतं. या तरुणाला भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरात राहणाऱ्या अफसर अली अजगर अली शेख या 18 वर्षांच्या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर स्टेटस म्हणून पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
advertisement
या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसवर 'चाहे जो हो जाये सपोर्ट तो बस पाकिस्तान को करेंग' असं लिहिलं होतं. तरुणाच्या या स्टेटसवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या तरुणाच्या विरोधात बीएनएस कलम 152 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली.
'सहन करणार नाही'
'सोशल मीडियावर देशविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत. याप्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे', असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले. भिवंडी पोलिसांची ही कारवाई सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून राष्ट्रविरोधी पोस्ट करणाऱ्यांना कठोर संदेश म्हणून पाहिलं जात आहे.