कर्जत रेल्वे स्थानकावर 'प्री नॉन-इंटरलॉकिंग (PNI)' कामासाठी 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात येत आहे. 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळामध्ये, काही कामासाठी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्याचा परिणाम इतका कर्जत- खोपोली मार्गावरील प्रवाशांवर झाला होता. परंतु आता 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर रोजी रेल्वे वाहतुकीवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्याचा परिणाम थेट कर्जत- खोपोलीतील प्रवाशांवर होणार आहे.
advertisement
हा विशेष ब्लॉक, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:20 ते सायंकाळी 05:20 वाजेपर्यंत तर 2 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सकाळी 11:00 ते दुपारी 03:30 वाजेपर्यंत कर्जत परिसरातील गाड्यांची वाहतूक विस्कळीत राहणार आहे. हा ब्लॉक भिवपुरी स्थानक, जांब्रुंग केबिन, ठाकूरवाडी, नागनाथ केबिन ते कर्जत या संपूर्ण विभागात लागू राहणार आहे. या दोन दिवसांत कर्जत- खोपोली दरम्यान अप आणि डाउन लोकल गाड्यांची सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे खोपोलीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
शिवाय, विशेष ब्लॉकच्या काळात अनेक कर्जत-सीएसएमटी लोकल नेरळ किंवा अंबरनाथ येथेच थांबवल्या जाणार आहेत. अनेक गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन होणार असून, काही गाड्या नेरळ, अंबरनाथ किंवा ठाणे येथूनच सुरू होतील. लोकलबरोबरच एक्सप्रेस आणि सुपरफास्ट एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही मोठा बदल करण्यात येणार आहे. अनेक मेल- एक्सप्रेस तब्बल दीड ते दोन तास वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर थांबवाव्या लागणार आहेत.
जोधपूर-हडपसर एक्सप्रेस, सीएसएमटी-भुवनेश्वर एक्सप्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस, बिकानेर-यशवंतपूर एक्सप्रेस, पनवेल-नांदेड एक्सप्रेस यांसारख्या गाड्या भिवंडी, भिवपुरी रोड, नेरळ, वांगणी आणि चौक येथूनच पुढच्या प्रवाशासाठी पुर्ववत करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक गाड्या १५ ते २० मिनिट उशिराने धावतील. तसेच चेन्नई एक्सप्रेस आणि मदुरै एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, त्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटणार आहेत.
दरम्यान, 2 ऑक्टोबरलाही अनेक रेल्वे गाड्या रद्द होणार आहेत. त्याचबरोबर नेरळ, अंबरनाथ आणि ठाणे येथून गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन आणि टर्मिनेशन केले जाणार आहे. त्यामुळे दिवसभर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे. कर्जत स्थानकावरील प्री नॉन- इंटरलॉकिंगमुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. जुन्या पद्धतीच्या इंटरलॉकिंग सिस्टीमऐवजी आधुनिक प्रणाली बसवली जात आहे. या कामामुळे भविष्यात रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि वेळेवर होईल. ट्रेनची गती वाढेल आणि अपघाताचा धोका सुद्धा अधिक कमी होईल.
कर्जत स्थानक हे मुंबई, खोपोली, लोणावळा आणि पुणे या स्थानकांवर जाणाऱ्या रेल्वेसाठी प्रमुख केंद्रबिंदु आहे. त्यामुळे कर्जत स्थानकावर होणारे बदल सर्वांसाठीच महत्त्वाचे आहेत.