दाट धुक्याचा थेट फटका रेल्वेला
गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी 42 पेक्षा अधिक एक्स्प्रेस गाड्या उशिरा मुंबईत दाखल होत असून काही गाड्या तब्बल पाच तासांनंतर पोहोचत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाना, दिल्लीसह अनेक भागांत तापमानात मोठी घसरण झाली आहे. पहाटेच्या वेळी दाट धुके पडत असून दृश्यमानता अत्यंत कमी होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने लोको पायलट्सना गाड्या कमी वेगाने चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिणामी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास वेळेत पूर्ण होत नसून त्या उशिराने मुंबईत पोहोचत आहेत.
advertisement
लोकल सेवेवर परिणाम झाला की नाही?
सकाळच्या वेळेत उत्तर भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या मुंबईत दाखल होत असल्याने लोकल सेवांवर अधिक ताण निर्माण होत आहे. कर्जत, कसारा ते कल्याण तसेच कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका नसल्याने एकाच ट्रॅकवरून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे उशिरा येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग देण्यासाठी अनेकदा लोकल थांबवाव्या लागत आहेत.
यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडत असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मध्य रेल्वे मार्गावर दररोज देशभरातून येणाऱ्या 40 हून अधिक एक्स्प्रेस गाड्यांच्या विलंबाचा फटका किमान 14 लोकल सेवांना बसत आहे. अलीकडेच मडगाव एक्स्प्रेस तब्बल सहा तास उशिरा मुंबईत पोहोचली ज्याचा थेट परिणाम सकाळच्या लोकल फेऱ्यांवर झाला.
