जेएनपीटी रोडवर काळाचा घाला
सुमित हा आपल्या मोटरसायकलवरून उलवे ते पनवेल लेनच्या दिशेने जात होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सुमित रस्त्यावर फेकला गेला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघातात सुमितच्या डोक्याला, हाताला आणि पायांना गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती.
advertisement
अपघातातील जखमी तरुणाने सोडला प्राण
सुमितने तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर 14 जानेवारी रोजी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुमितच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे. अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
