मेट्रो स्थानकाच्या नावावरून ग्रामस्थांचा संताप
दहिसर ते मिरा-भाईंदरदरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील एका स्थानकाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित मेट्रो स्थानकाला 'पांडुरंग वाडी'असे नाव देण्यात आले आहे. मात्र हे स्थानक प्रत्यक्षात पेणकर पाडा गावालगत उभे आहे. त्यामुळे स्थानकाचे नाव 'पेणकर पाडा'असे ठेवावे अशी मागणी ग्रामस्थ आणि स्थानिक समितीकडून करण्यात येत आहे.
advertisement
काय आहे मेट्रोचा नाव वाद?
हा मेट्रो प्रकल्प एमएमआरडीए यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. स्थानिकांच्या मते पांडुरंग वाडी हा भाग मूळ पेणकर पाडा गावाचाच एक छोटा उप-परिसर आहे तसेच पांडुरंग वाडी हे स्थानकापासून सुमारे 800 मीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. त्यामुळे जवळच्या मुख्य गावाचे नाव न देता लांबच्या उप-परिसराचे नाव देणे योग्य नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पेणकर पाडा हे मिरा-भाईंदरमधील ऐतिहासिक 19 गावांपैकी एक आहे. या गावाला शंभर वर्षांहून अधिक इतिहास आहे आणि विविध समाजघटक येथे वास्तव्यास आहेत. गावाची स्वतंत्र ओळख आणि परंपरा जपली जावी अशी स्थानिकांची मागणी आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन स्थानकाचे नाव बदलण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
