पुलाची एकूण लांबी १,२६५ मीटर असून, बॉक्स गर्डर आणि काँक्रिटचा वापर करण्यात येत आहे. पुलाचे काम दोन टप्प्यांत विभागले असून एक टप्पा गोरेगाव बाजूचा आणि दुसरा मुलुंड बाजूचा आहे. पुलाची सुरुवात दिंडोशी न्यायालयाजवळून होते आणि तो रत्नागिरी जंक्शन येथे ९० अंशात वळतो तर शेवटी तो दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरत असल्याचे नियोजन आहे. आतापर्यंत एकूण २६ पैकी १२ स्पॅनचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १४ स्पॅन फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
advertisement
या प्रकल्पात उड्डाणपुलासोबत एलिव्हेटेड रोटरी, पादचारी पूल आणि स्वयंचलित सरकते जिने यांचाही समावेश आहे. प्रकल्प चार टप्प्यांत राबवण्यात येत असून, सद्य:स्थितीत टप्पा ३ (अ) चे काम सुरू आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सुमारे १२.२० किमी लांबीच्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी होईल. त्यामुळे इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी कमी होणार असून मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही सुधारणा होईल.