100 रुपयांत कोकणपर्यंत सफर
आता 100 रुपयांत कोकणपर्यंतचा प्रवास आता शक्य झाला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा–रोहा–चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 25 वर्षांनंतर ही मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अवघ्या 100 रुपयांत मुंबई उपनगरातून कोकणपर्यंत सहज प्रवास करता येणार आहे.
दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा दोन्ही मार्गांवर मेमू सेवा सुरू
advertisement
कोरोनाच्या काळात दादर-दिवा पॅसेंजर बंद झाली होती. ती पुन्हा सुरू करण्याची मागणी अनेक प्रवाशांनी केली होती. त्यानंतर गणेशोत्सव काळात वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने 15 ऑगस्टपासून मेमू रेल्वे सुरू केली. आता या गाड्या कायमस्वरूपी धावणार आहेत. दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा अशा दोन मेमू गाड्या रोज उपलब्ध राहतील.
असे असेल गाडीचे वेळापत्रक
पहिली गाडी ही सकाळी 7.15 वाजता दिवा रेल्वे स्थानकातून चिपळूणसाठी निघेल तर दुसरी गाडी दुपारी 12 वाजता चिपळूणहून दिवासाठी रवाना होईल. या दोन्ही गाड्या साधारण सहा ते सात तासांत पोहोचतात. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि स्वस्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच एक्स्प्रेस गाड्यांवरील ताणही कमी होणार आहे.
'या' स्थानंकावर असेल थांबा
या मेमू रेल्वेला एकूण 26 स्थानकांवर थांबा असेल. त्यात चिपळूण, खेड, वीर, माणगाव, इंदापूर, गोरेगाव, कोलाड, रोहा, पेण, पनवेल यांसारख्या स्थानकांचा समावेश आहे. सध्या कोकण रेल्वेमार्गावर दिवसात सुमारे 26 एक्स्प्रेस गाड्या धावतात, परंतु चिपळूण स्थानकावर थांबा असलेल्या या गाड्या रत्नागिरी, गोवा, कर्नाटक आणि केरळहून भरून येतात. त्यामुळे चिपळूणहून पुढे प्रवास करणाऱ्यांना उभं राहून प्रवास करावा लागतो.
दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांना थेट रेल्वेसेवा नाही. संगमेश्वर आणि खेड येथे स्थानक असले तरी अनेक एक्स्प्रेस गाड्या तिथे थांबत नाहीत. त्यामुळे या भागातील प्रवासी चिपळूणला येऊन रेल्वे पकडतात. खेड तालुक्यातील 15 गावांचे लोक, चिपळूणच्या पूर्व भागातील आणि सावर्डे परिसरातील प्रवासीही आता या मेमू सेवेमुळे अधिक सोयीस्करपणे प्रवास करू शकतील.मेमू गाडी सुरू झाल्याने कोकणवासीयांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. कमी खर्चात, वेळेत आणि आरामात प्रवास करण्याची ही उत्तम सुविधा ठरणार आहे.
