मुंबई : श्रावण संपून अनेक दिवस सरले. गणेशोत्सवही दणक्यात पार पडला. आता मांसाहारप्रेमींना मन भरेपर्यंत चिकन, मटण, मासे खायला हरकत नाही. रविवारी माशांवर ताव मारण्याचा अनेकजणांचा प्लॅन असेल. जर तुम्ही मुंबईकर असाल आणि मासे लय आवड असतील तर ही माहिती तुमच्याचसाठी आहे.
मालाडमधील मासळी बाजार हे मुंबईतल्या प्रसिद्ध फिश मार्केटपैकी एक आहे. ताजे मासे मिळत असल्यानं या ठिकाणाला खवय्यांची विशेष पसंती असते. इथं अनेक प्रकारचे मासे मिळतात. तुम्ही फक्त नाव सांगायचं. केवळ सामान्य नागरिकांना नाही, तर मोठमोठ्या हॉटेल आणि उपहारगृहांनादेखील इथून मासे पुरवले जातात.
advertisement
मालाडच्या मासळी बाजारातील दर पुढीलप्रमाणे: बोंबील वाटा 100 रुपये, बांगडा 12चा वाटा 200 रुपये, मोठी मुशी प्रत्येकी 100 ते 200 रुपये, कोळंबी वाटा 50 ते 200 रुपये. तर, लहान आकाराचे पापलेट 200 आणि मोठ्या आकाराचे पापलेट 1000 रुपयांपासून मिळतात.
इथले मासे जेवढे ताजे, स्वादिष्ट असतात, त्या तुलनेत परवडणाऱ्या दरात मिळतात. त्यामुळे इथं मासेप्रेमींची मोठी गर्दी असते. सकाळच्या वेळी होलसेल विक्रेत्यांसाठी आणि दुपारी 2 वाजल्यानंतर सामान्य नागरिकांसाठी हे बाजार सुरू असतं. त्यामुळे तुम्हीही मासेप्रेमी असाल आणि रविवारी लय भारी बेत करायचा असेल, तर मालाडच्या मासळी बाजाराला नक्कीच भेट देऊ शकता.