नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग नगर २ मधील एका घरात पहाटे ३ च्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत होते. याच वेळी घरातील फ्रीजचा अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण घराला आगीने विळखा घातला. झोपेत असल्याने घरातील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अर्ध्या तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत आगीत अडकलेल्या तिघांचा मृत्यू झाला होता.
एकाच कुटुंबावर काळाचा घाला
या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले तिन्ही मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून, झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की त्यांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जवानांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. फ्रीजचा स्फोट नेमका कशामुळे झाला? शॉर्ट सर्किट झाले होते का? या संदर्भात गोरेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी सखोल तपास करत आहेत.
