मुंबई महापालिकेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे.
advertisement
चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना आवाहन
दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जावू नये, तसंच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) इथं येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी, असंही आवाहन पालिकेनं केलं आहे.
दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या भरतींचं वेळापत्रक
१. गुरुवार, दि. ०४.१२.२०२५ - रात्री – ११:५२ वा.- लाटांची उंची - ४.९६ मीटर
२. शुक्रवार, दि. ०५.१२.२०२५ सकाळी – ११:३० वा.- लाटांची उंची - ४.१४ मीटर
३. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -मध्यरात्री – १२:३९ वा.-लाटांची उंची - ५.०३ मीटर
४. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -दुपारी – १२.२० वा.- लाटांची उंची - ४.१७ मीटर
५. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -मध्यरात्री – ०१.२७ वा. लाटांची उंची - ५.०१ मीटर
६. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -दुपारी – ०१.१० वा. लाटांची उंची - ४.१५ मीटर
