स्वस्तात घर असूनही मुंबई-पुणेकरांची घराकडे पाठ
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाने ऑक्टोबर 2025 मध्ये 5,285 घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीत 4,523 विजेत्यांची नावे जाहीर केली गेली होती. मात्र 45 टक्के विजेत्यांनी म्हणजेच सुमारे 2,000 जणांनी घरे नाकारली. त्यामुळे मंडळाची चिंता वाढली आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाने 5,285 घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया राबवली होती, पण 762 घरांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही घरे प्रत्यक्ष सोडतीत समाविष्ट केली गेली नाहीत. आता 45 टक्के विजेत्यांनी घरे नाकारल्यामुळे रिक्त घरे वाढली आहेत. मागील काही वर्षांपासून अशी घरे नाकारण्याचे प्रकार वाढत आहे. यामुळे कोकण मंडळाच्या विविध सोडतीतील रिक्त राहिलेली घरे आता 14,000 पेक्षा जास्त झाली आहेत.
advertisement
घर न घेण्याची मुख्य कारणं कोणती?
काही वर्षांपूर्वी म्हाडाच्या घरांसाठी लाखो अर्ज येत होते पण आता परिस्थिती बदलली आहे. घरं नाकारण्यामागे मुख्य कारणं म्हणजे वाढलेल्या किमती, मुख्य शहरापासून लांब असलेली घरे, सोयी-सुविधा कमी आणि दळणवळणाची अडचण.
ऑक्टोबर 2025 च्या सोडतीत मंडळाने एकूण घरांच्या 10 टक्के प्रतीक्षा यादी जाहीर केली होती. आता नाकारलेल्या घरांच्या जागी प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना संधी दिली जाईल. स्वीकृतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.मात्र,प्रतीक्षा यादी फक्त 10 टक्के असल्याने 2,000 घरांपैकी काही घरे रिक्त राहण्याची शक्यता आहे. जर प्रतीक्षा यादीतील विजेत्यांनीही घरे नाकारली तर कोकण मंडळाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. म्हाडा आता या रिक्त घरांसाठी जलद मार्गाने निर्णय घेण्याचे ठरवले आहे जेणेकरून कोकणातील लोकांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळू शकतील
