मुंबईच्या बाजारपेठेत माल आवक होणार वेळेत
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठी भाजीपाला बाजारपेठ आहे. दररोज होणाऱ्या एकूण आवकीपैकी तब्बल 60 ते 70 टक्के भाजीपाला मालवाहू गाड्या अहिल्यानगर जिल्ह्यातून याच महामार्गाद्वारे माळशेज घाट, मुरबाड, कल्याणमार्गे नवी मुंबईत पोहोचतात. त्याचप्रमाणे मुंबईसाठी दुधाचाही मोठा पुरवठा रोज याच रस्त्याने होतो. सध्या हा मार्ग दुपदरी असल्याने वाहतूक कोंडी होत असते पण आता या अडथळ्यांपासून दिलासा मिळणार आहे.
advertisement
मंत्रालयाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत फेगडे यांच्या माहितीनुसार मार्गाचे चौपदरीकरण गरजेचे असले तरी अहिल्यानगरपर्यंत मोठा भाग वनक्षेत्रात येत असल्याने परवानगीची अडचण निर्माण झाली. त्यामुळे काही ठिकाणीच चौपदरीकरण झाले असून उर्वरित मार्ग तीन पदरी करण्यात आला आहे.
किती काम पूर्ण झाले?
कल्याण शहराबाहेर मुरबाड दिशेने चार किमीचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. मुरबाड ते मोरोशी या 20 किमी भागात वनजमिनीचे प्रश्न असल्याने उशीर झाला असून आता भूसंपादन सुरू आहे. मोरोशी ते माळशेज घाट पायथा आणि पुढे माळशेज घाट ओलांडून पारगाव-ओतूर या 40 किमी भागासह मिळून 70 किमी मार्गाचा विस्तार शेवटच्या टप्प्यात आहे. एप्रिल 2026 पर्यंत या भागात तीन पदरी रस्ता उपलब्ध होईल अशी माहिती मंत्रालयाशी निगडित संबंधित अधिकाऱ्यांनी दिली
