ट्रॅफिक कोंडीला रामराम
हा फ्लायओव्हर स्टील गर्डर आणि आरसीसी डेक स्लॅब या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणार आहे. फ्लायओव्हरची सुरुवात कुर्ल्यातील कल्पना टॉकीज परिसरातून होईल आणि तो घाटकोपरमधील पंखे शाह दर्गाजवळ उतरेल. एकूण 4.24 किमी लांबीच्या या प्रकल्पात मुख्य फ्लायओव्हर 3.91 किमीचा असेल. कुर्ला बाजूला 146 मीटर तर घाटकोपर बाजूला 180 मीटर लांबीचे लँडिंग रॅम्प तयार केले जाणार आहेत.
advertisement
एलबीएस रोडवर सध्या अनेक ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. अंधेरी-घाटकोपर लिंक रोड जंक्शन, घाटकोपर रेल्वे स्थानक परिसर आणि संत नरसी मेहता रोड या ठिकाणी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या फ्लायओव्हरमुळे हे सर्व जंक्शन बायपास करता येणार असून प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
हा चार लेनचा फ्लायओव्हर असून त्याची एकूण रुंदी 16.5 मीटर असेल. बीएमसीच्या अंदाजानुसार हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. पूर्ण झाल्यानंतर कुर्ला–घाटकोपर परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
