प्रवाशांचा प्रवास आता नव्या लोकलमधून
सध्या मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे 3,000 लोकल फेऱ्या दररोज चालवल्या जातात. या माध्यमातून तब्बल 60 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे प्रवासी बाहेर लटकण्याचे प्रकार टळतात आणि अपघातांची शक्यता कमी होते. त्यामुळेच नॉन-एसी लोकलमध्येही ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
advertisement
या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती देताना चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या दोन नॉन-एसी लोकल रेकची निर्मिती सुरू असल्याचे स्पष्ट केले. खासदार वर्षा गायकवाड आणि संजय दिना पाटील यांनी लोकलमधील वाढत्या मृत्यूंबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.
या नव्या ईएमयू रेकमध्ये स्वयंचलित दरवाजे, डब्यांमधील वेस्टिब्युल जोडणी, छतावरील विशेष व्हेंटिलेशन यंत्रणा आणि हवेच्या प्रवाहासाठी खिडकीवरील झडप यांचा समावेश असणार आहे. याआधी मध्य रेल्वेने कुर्ला कारशेडमध्ये अशाच प्रकारचा प्रयोग केला होता. पण तांत्रिक कारणांमुळे त्याला तात्पुरती मान्यता मिळाली नव्हती.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सध्या धावणाऱ्या साध्या लोकल गाड्यांमध्ये थेट ऑटोमॅटिक दरवाजे बसवणे शक्य नाही. मात्र भविष्यात येणाऱ्या नव्या लोकल गाड्या या सुधारित स्वरूपात आणल्या जातील. तसेच पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने 238 नव्या एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील अशी माहितीही देण्यात आली आहे.
