पश्चिम रेल्वेवर मोठा ब्लॉक
कांदिवली-बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी 20 डिसेंबर 2025 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येत आहेत. या काळात दररोज नियोजित लोकल फेऱ्यांच्या तुलनेत सुमारे 10 ते 15 टक्के लोकल सेवा रद्द होत आहेत. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण वाढली आहे.
advertisement
कोणत्या वेळेत असेल ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कांदिवली ते मालाड स्थानकांदरम्यान पॉइंट क्रमांक 103 तोडण्यासाठी मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक अप जलद मार्गावर रात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत तर डाऊन जलद मार्गावर रात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत असेल. तसेच बुधवारी रात्री पॉइंट क्रमांक 102 तोडण्यासाठीही असाच ब्लॉक घेतला जाणार आहे. या दिवशीही अप आणि डाऊन जलद मार्गावर ठरावीक वेळेत वाहतूक बंद राहणार आहे.
एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल
पाचव्या मार्गावरील काम, वेगमर्यादा आणि अन्य कामासाठी अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येतील. काही गाड्यांच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. 13 आणि 14 जानेवारी रोजी नंदुरबार-बोरिवली आणि अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोडपर्यंतच धावतील. तर 14 आणि 15 जानेवारी रोजी बोरिवलीहून सुटणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्या वसई रोडवरून चालवण्यात येतील.
14 आणि 15 जानेवारी रोजी प्रत्येकी 144 लोकल सेवा रद्द राहणार आहेत. गेल्या वर्षी खार रोड ते कांदिवलीपर्यंत सहावी मार्गिका सुरू झाली होती. आता कांदिवली ते बोरिवलीपर्यंत हा विस्तार होत असून भविष्यात लोकल सेवेचा वेळेतपणा सुधारण्यास आणि लोकल फेऱ्या वाढवण्यास याचा मोठा फायदा होणार आहे.
