सीईटी परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नोंदणी प्रक्रियेवेळी उमेदवारांना जर अधिकाधिक माहिती हवी असेल तर, सीईटीच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेऊ शकता. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बातमीमध्ये उपलब्ध असलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. एमपीएड आणि एमएड या दोन्हीही अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा राज्यातल्या विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कॉम्प्युटरवर घेतली जाणार आहे.
advertisement
नोंदणी आणि परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे. दरम्यान, एमपीएडच्या सीईटी परीक्षेसाठी अर्जदारांना 20 जानेवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असून, 24 मार्चला सीईटी परीक्षा होणार आहे. तर, एमपीएड फिल्ड टेस्ट (ऑफलाईन) ही परीक्षा 25 मार्चला होणार आहे. एमएड अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 20 जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार असून 25 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. कला, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या एकूण 17 अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले.
विद्यार्थ्यांची अचूक माहिती मिळावी आणि त्यांच्या संपूर्ण माहितीची पडताळणी करणे सहज शक्य होण्यासाठी सीईटी सेलने प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी 'ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना युनिक डिसॲबिलिटी आयडी (यूडीआयडी) बंधनकारक केले आहे. अपार, यूडीआयडीद्वारे पडताळणी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अपार तयार केलेले नाही, त्यांनी ते डिजिलॉकर ॲपच्या माध्यमातून तयार करून घ्यावे, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.
