रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी २० डिसेंबर २०२५ रोजी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या सन्मानार्थ आयोजित एका विशेष कार्यक्रमात आपले विचार मांडले. डॉ. माशेलकर यांनी विक्रमी ५४ पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याच्या यशाचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम देशातील विज्ञान, नाविन्य (Innovation) आणि औद्योगिक विचारांमधील डॉ. माशेलकर यांच्या योगदानावर केंद्रित होता. व्यासपीठावरून बोलताना मुकेश अंबानी यांनी भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजातील नाविन्यपूर्णतेची भूमिका आणि वैज्ञानिक विचार भारताच्या भविष्याला कशी आकार देतात, यावर सविस्तर भाष्य केले.
advertisement
काय म्हणाले मुकेश अंबानी?
शुभ संध्याकाळ,
ही संध्याकाळ माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप खास आहे. माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या दोन व्यक्ती इथे उपस्थित आहेत. पहिले, प्रोफेसर एम.एम. शर्मा, ज्यांचा प्रभाव माझ्यावर मी २० वर्षांचा असल्यापासून आहे. दुसरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्यांना मी १९९० च्या दशकात भेटलो होतो. या दोघांनीही माझ्या विचारांना दिशा दिली आणि रिलायन्सच्या अनेक यशांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
सर्वात आधी, मी प्रोफेसर शर्मा यांच्याबद्दल माझा मनापासून आदर व्यक्त करतो. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. येथे उपस्थित असलेले सर्व शास्त्रज्ञ, उद्योगातील सहकारी आणि विशेषतः माशेलकर कुटुंबियांना माझा नमस्कार.
आज आपण एका असामान्य भारतीय शास्त्रज्ञाचा सन्मान करत आहोत. डॉ. माशेलकर यांना ५४ मानद डॉक्टरेट पदव्या मिळाल्या आहेत. हो, ५४! सामान्य माणसं आयुष्यात एक पदवी मिळवण्यासाठी संघर्ष करतात, तर डॉ. माशेलकर यांनी एखाद्या 'फ्रीक्वेंट फ्लायर'सारखे मैलाचे दगड पार करत या पदव्या मिळवल्या आहेत.
जेव्हा कधी मी त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करायचो, तेव्हा ते नेहमी म्हणायचे की, "खरे काम तर अजून सुरू व्हायचे आहे." हेच त्यांचे जीवनदर्शन आहे. ते फळांनी लगडलेल्या एखाद्या वृक्षासारखे आहेत, जो नेहमी विनम्रतेने झुकलेला असतो. विनम्रता हीच त्यांची खरी ओळख आहे.
डॉ. माशेलकर यांच्या जीवनप्रवासात मला आधुनिक भारताचा प्रवास दिसतो. मुंबईच्या रस्त्यावरील दिव्यांखाली अभ्यास करणारा एक मुलगा पूर्ण देशाचा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रकाशित करतो. लहानपणी त्यांच्याकडे आई अंजनीजींचे प्रेम आणि स्वतःची मेहनत होती. याच गोष्टींनी त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली.
असे म्हटले जाते की, भारतीय समाज एका 'हिमखंडा' (Iceberg) सारखा आहे, जिथे बहुतांश लोक पृष्ठभागाच्या खाली राहतात. शास्त्रज्ञ आणि उद्योजकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी या हिमखंडाला वर आणावे जेणेकरून प्रत्येकजण चांगले जीवन जगू शकेल. हाच प्रोफेसर शर्मा, डॉ. माशेलकर आणि माझे वडील धीरुभाई अंबानी यांचा दृष्टिकोन होता.
माझ्या वडिलांनी भारतीयांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने रिलायन्सची स्थापना केली. आजचा नवा भारत तरुण स्वप्नांनी भरलेला आहे. भारतात लाखो स्वप्ने पूर्ण होत आहेत. रस्ता लांब आहे, पण डॉ. माशेलकर म्हणतात त्याप्रमाणे, 'हे शक्य आहे'.
त्यांनी CSIR ला जागतिक दर्जाची संशोधन संस्था बनवले, पेटंटच्या लढाईत भारताच्या पारंपरिक ज्ञानाचे रक्षण केले आणि सरकार व उद्योगांना नाविन्यपूर्णतेचा सल्ला दिला. रिलायन्सला विज्ञान आणि 'डीप-टेक' आधारित कंपनी बनवण्यातही त्यांनी मोठी भूमिका बजावली.
१९९० च्या दशकात मी त्यांना सांगितले होते की, मला रिलायन्सला एक 'इन्व्होव्हेटिव्ह' कंपनी बनवायचे आहे. तेव्हा प्रोफेसर शर्मा विचारायचे, "तुम्ही किती काळ तंत्रज्ञान विकत घेणार? स्वतःचे तंत्रज्ञान कधी तयार करणार?" तिथूनच आमच्या भागीदारीची सुरुवात झाली.
आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, रिलायन्सच्या ५.५ लाख कर्मचाऱ्यांपैकी १ लाखांहून अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलची सुरुवात २००० मध्ये झाली, ज्यामध्ये नोबेल विजेते आणि जागतिक विचारवंत सहभागी झाले होते. आता ही आमची संस्कृती बनली आहे.
डॉ. माशेलकर यांनी आम्हाला 'डीप-टेक' च्या मदतीने अत्यंत परवडणारी उत्पादने तयार करण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी याला 'गांधीवादी इंजिनिअरिंग' असे नाव दिले. त्यांचा मंत्र होता "More from Less for More", म्हणजेच कमी संसाधनांत जास्त लोकांसाठी जास्त मूल्य निर्माण करणे.
ते म्हणाले होते की, भारताने एका चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी खर्चात 'मंगल मिशन' पूर्ण केले. हीच मानसिकता भारतीय कंपन्यांमध्ये रुजली पाहिजे. Jio हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. जिओने भारताला डिजिटल जगाच्या मुख्य प्रवाहात आणले.
त्यांनी आम्हाला ऊर्जेच्या प्रश्नावरही दिशा दिली. जर भारत आपली ८० टक्के ऊर्जा आयात करत राहिला, तर आपण समृद्ध होऊ शकणार नाही. आज आपण हरित आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने ठोस पावले उचलत आहोत.
डॉ. माशेलकर यांनी आम्हाला शिकवले की, तंत्रज्ञान हे केवळ एक यंत्र आहे ज्यात करुणा नसते, पण जेव्हा त्यात करुणा मिसळते, तेव्हा ती एक सामाजिक चळवळ बनते. Artificial Intelligence (AI) महत्त्वाचे आहेच, पण मानवी सहानुभूती (Empathy) त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे.
शिकण्याची त्यांची जिद्द आणि ओढ वयानुसार वाढतच गेली आहे. ते एक खरे 'ज्ञानयोगी' आहेत. ते IIT, IIM आणि छोट्या महाविद्यालयांशी ज्ञान शेअर करतात, कारण त्यांना भारताला जागतिक स्तरावरील संशोधन राष्ट्र बनवायचे आहे.
डॉ. माशेलकर हे विज्ञान आणि उद्योग यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा (Bridge) आहेत. भारताला अशा अनेक पुलांची गरज आहे. तेव्हाच भारत एक 'डीप-टेक' महासत्ता बनेल.
डॉक्टर साहेब, तुमचे जीवन प्रत्येक भारतीय मुलाला हेच शिकवते की, तुम्ही कुठून सुरुवात केली हे महत्त्वाचे नाही, तर तुमच्या स्वप्नांची व्याप्ती, तुमची मेहनत आणि तुमच्या विचारांची खोली किती आहे, हे महत्त्वाचे आहे.
रिलायन्स, हे व्यासपीठ आणि संपूर्ण देशाच्या वतीने मी तुम्हाला सलाम करतो. भारताला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद.
जय हिंद.
