मुंबई : मुलुंड मेट्रो अपघात प्रकरणात एमएमआरडीएकडून मोठी कारवाई करण्यात येत असून, आतापर्यंत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुलुंड येथे मेट्रो 4 च्या कामादरम्यान संरक्षक कठडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. चौकशीनंतर आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता अभिजित भिशीकर आणि उपअभियंता स्नेहल सावंत यांचा समावेश आहे. यापूर्वी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना निलंबित करण्यात आले होते.
advertisement
मुंबईतील मुलुंड (पश्चिम) भागात मेट्रो लाइन ४ (ग्रीन लाइन) च्या बांधकामादरम्यान उंचावरील पॅरापेट (काँक्रीटचा भाग) कोसळला. या भाग एका चार चाकी वाहनावर आणि रिक्षावर कोसळला. त्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर एमएमआरडीएने तत्काळ चौकशी समिती स्थापन करून अपघातास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित कंत्राटदार संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
चौकशीअंती सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष, कामाच्या दर्जात हलगर्जीपणा आणि देखरेखीतील त्रुटी या कारणांमुळे अपघात घडल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. यामुळे एमएमआरडीए प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
DB Hill LBG कंपनीला 1 कोटींचा दंड
दरम्यान, या प्रकरणात DB Hill LBG या कन्सल्टन्सी कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले असून, तिच्यावर एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या या कंपनीकडून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या हलगर्जीपणाला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.
मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न
या अपघातामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.
कठोर कारवाई होण्याची शक्यता
दरम्यान, एमएमआरडीएने मेट्रो 4 प्रकल्पाच्या कामाच्या सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नवीन सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर पुढील कठोर कारवाई होण्याची शक्यता असून, चौकशी अहवालाच्या आधारे आणखी कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
