सृष्टी आणि अमित यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. अमित जैन हा हिरे खरेदी–विक्रीचा स्वतःचा व्यवसाय करणारा व्यावसायिक आहे. दोघे जोगेश्वरी पूर्व येथील मसाजवाडी बस डेपो परिसरातील एका आलिशान सोसायटीत राहत होते. त्यांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली होती. या दाम्पत्याला मूलबाळ झालं नव्हतं. याच कारणावरून सृष्टीवर पती आणि सासऱ्यांकडून मानसिक तसेच शारीरिक छळ होत असल्याची चर्चा होती. या नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचललं असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास सृष्टीने आपल्या बेडरूमच्या बाल्कनीतून थेट खाली उडी घेतल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे. आवाज ऐकून इमारतीतील रहिवाशांनी पोलिस आणि रुग्णवाहिकेला कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या मेघवाडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात आत्महत्येची स्पष्ट कारणमीमांसा अजून झालेली नाही. घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र छळाच्या आरोपांचा गंभीरपणे तपास करण्यात येत असून पती, सासरा आणि कुटुंबीयांची चौकशी केली जाणार आहे.
सृष्टीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून वैवाहिक छळाच्या वाढत्या घटनांबद्दल पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
