बाहेर पडले अन् परतलेच नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार,मृत व्यक्तीचे नाव भीमराव मोरे (वय 58) असे असून ते दहिसर पूर्व परिसरात वास्तव्यास होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ते कामानिमित्त घटनास्थळाच्या परिसरातून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या उजव्या बाजूने एक खासगी प्रवासी बस वेगाने जात होती.
बस सुरू असतानाच तिच्या डाव्या बाजूचा लगेज कपाटाचा दरवाजा अचानक उघडला. हा दरवाजा थेट भीमराव मोरे यांच्या डोक्याला जोरात आदळला. या जोरदार धडकेमुळे मोरे रस्त्यावर कोसळले. अपघात इतका गंभीर होता की ते जागीच गंभीर जखमी झाले.
advertisement
58 वर्षीय व्यक्तीचे जीवन एका क्षणात संपले
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मोरे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या बसची तपासणी करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खासगी बसमधील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
