भररस्त्यात रक्तरंजित थरार...
ही घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास मरोळ भागात घडली. आरोपी राजेश छत्रे (४६) हा मूळचा ठाण्याचा रहिवासी असून तो व्यवसायाने रिक्षाचालक आहे. त्याची पत्नी साकीनाका परिसरात राहत होती. कौटुंबिक वादामुळे गेल्या काही काळापासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. २८ फेब्रुवारी रोजी आरोपीने मरोळ भागात पत्नीला अडवले आणि तिला पुन्हा सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र, तिने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.
advertisement
पूर्वनियोजित कट की संताप?
वादादरम्यान राजेशने पत्नीचा हात पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि स्वतःसोबत आणलेल्या धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. आरोपीने चाकू आधीच सोबत आणला असल्याने, ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी राजेश छत्रे याला अटक करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
