पोलिसांनी अखेर अटक केली
ओशिवारा गोळीबार प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता आणि वादग्रस्त रिव्ह्यूअर कमाल आर खान (KRK) याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी अंधेरी परिसरातून त्याला ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर या गुन्ह्यातील त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे लोखंडवाला परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून फिल्म इंडस्ट्रीतही खळबळ उडाली आहे.
advertisement
खारफुटीच्या दिशेने गोळी झाडली पण...
तपासादरम्यान केआरकेने पोलिसांकडे एक विचित्र दावा केला आहे. त्याने सांगितले की, तो आपले पिस्तूल साफ करत असताना अचानक गोळी सुटली. पिस्तूल साफ करताना शेजारीच असलेल्या खारफुटीच्या दिशेने ही गोळी झाडली गेल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात हा दावा संशयास्पद वाटत असून, गोळीबाराचा उद्देश नेमका काय होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
गोळी नालंदा इमारतीत शिरली
केआरकेने झाडलेली ही गोळी थेट लोखंडवाला येथील नालंदा इमारतीत शिरली. ही इमारत परिसरातील हाय-प्रोफाइल इमारतींपैकी एक मानली जाते. इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही गोळी लागल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका निष्पाप व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचला असल्याचे समोर आले आहे.
मॉडेल घरात रिहर्सल करत होता
या घटनेतील सर्वात थरारक बाब म्हणजे, ज्या वेळी ही गोळी चौथ्या मजल्यावर शिरली, तिथे मॉडेल प्रतीक बेदी आपल्या घरात रिहर्सल करत होता. गोळी प्रतीकच्या अगदी जवळून गेली, ज्यामुळे तो थोडक्यात बचावला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे प्रतीक आणि त्याचे कुटुंब हादरले असून, त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली होती. प्रतीक बेदीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या.
वार्यामुळे गोळ्यांची दिशा बदलली
दरम्यान, आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलाची साफसफाई केल्यानंतर ती चालू आहे का हे तपासण्यासाठी केआरके यांनी गोळीबार केला. खानने सांगितले की, घराशेजारील खरफुटी परिसराच्या दिशेने गोळ्या झाडल्या, कारण तिथे मोकळी जागा आहे आणि कुणालाही धोका निर्माण होणार नाही. मात्र, वार्यामुळे गोळ्यांची दिशा बदलली आणि त्या ओशिवरा येथील निवासी इमारतीवर जाऊन लागल्या.कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता, असा दावा केआरके यांनी केला आहे.
