'हेवन टेरेस 72 कॅफे'मधून रॅकेट
साकिनाका येथील अंधेरी पूर्व भागातील 'हेवन टेरेस 72 कॅफे'मधून हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अटक करण्यात आलेल्यांमध्ये 3 महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे एका व्यावसायिकाने स्वतः डिकोय (सापळा) बनून या रॅकेटचा 10 दिवस अभ्यास केला आणि पोलिसांच्या मदतीने या टोळीला उघडकीस आणलं. खार येथील 38 वर्षीय व्यावसायिक पंकज यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पुढाकार घेतला होता.
advertisement
डेटिंग ॲपवर 399 रुपये नोंदणी शुल्क
पंकज यांच्या एका मित्राला या टोळीने लुटल्याचं समजल्यानंतर, यादव यांनी या टोळीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. डेटिंग ॲपवर 399 रुपये नोंदणी शुल्क भरल्यानंतर युजर्सना मेसेज यायचे. विश्वास संपादन करण्यासाठी सुरूवातीला एक पुरूष बोलायचा अन् मग एक महिला व्हॉट्सॲप कॉल करून पीडित व्यक्तीला साकिनाका येथील संबंधित कॅफेमध्ये भेटायला बोलवायची. तिथे गेल्यावर ती महिला एकापाठोपाठ एक महागड्या ऑर्डर द्यायची, ज्यामुळे बिलाचा आकडा फुगवला जायचा.
18, 626 रुपयांचे बिल
यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅफेमध्ये दारूच्या नावाखाली केवळ पाणी दिले जात होते, मात्र त्या पाण्याचं बिल मद्याच्या दराने आकारलं जात असे. यादव यांना स्वतःला 18, 626 रुपयांचे बिल देण्यात आलं होतं. या सर्व प्रकाराची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची भेट घेतली. त्यानंतर पवई पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. यादव स्वतः एका महिलेसोबत डिकोय म्हणून कॅफेमध्ये गेले. तिथं कर्मचाऱ्यांनी आणि बाऊन्सरनी त्यांना धमकावून फुगवलेलं बिल भरण्यास भाग पाडलं, तेव्हाच पोलिसांनी छापा टाकला अन् महिलेसह आरोपींना रंगेहात पकडलं.
कॅफेकडे मद्य विक्रीचा परवाना नाही
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथं आणखी एक पीडित व्यक्ती सापडली, ज्याला केवळ एक ड्रिंक घेतलेले असतानाही 25000 रुपये भरण्यासाठी धमकावलं जात होतं. तपासात समोर आलं आहे की, कॅफे व्यवस्थापन आणि तरुण-तरुणींच्या एका गटाने मिळून हे रॅकेट चालवले होते. या कामात त्यांना दिल्लीतील दोन व्यक्ती डेटिंग प्लॅटफॉर्मवर सावज शोधण्यासाठी मदत करत असत. या कॅफेकडे मद्य विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचंही तपासात उघड झालंय. त्याकडे एकही कागद नव्हता.
तब्बल 11 जणांना अटक
दरम्यान, घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, बिलिंग मशीन, पावत्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मयूर डिडोले आणि नितेश आमडसकर या कॅफे चालकांसह मॅनेजर मयांक कटुरिया, मोहसीन खान आणि बाऊन्सर जतीन कुमार याला अटक केलीये. या कारवाईमुळे डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अनोळखी व्यक्तींना भेटताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
