27 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यापूर्वीच कोकणवासी गावाकडे जात असतात. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी घालण्यात येणार आहे. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजलेपासून 29 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश राहणार आहेत.
advertisement
या दिवशीही वाहतूक बंदी
मुंबई – गोवा महामार्गावर 23 ते 29 ऑगस्टसह 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजलेपासून 8 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत बंदी आदेश राहतील, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
दरम्यान, रायगड जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल देखील आदी उपस्थित होते.
महामार्गावरील सुविधा
गणेश भक्तांसाठी महामार्गावर तयारी करण्यात आली आहे. सुविधा केंद्रांवर पोलिस मदत केंद्र, आपत्कालीन पोलिस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहनदुरुस्ती कक्ष, टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असणार आहे. तसेच वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार, बालक आहार कक्ष, मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस, महिलांसाठी फिडींग कक्ष देखील असेल.
सुरक्षेसाठी सतर्कता
गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. तसेच या कालावधीत दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी एटीबी व एटीसीची पथके नियुक्त करण्यात येतील. सोशल मीडिया देखरेखीसाठी देखील सायबर सेल सतर्क राहणार आहे.
