मुंबई महानगरपालिकेच्या महापौर दालनात सोमवारी राजकीय शिष्टाचाराला हरताळ फासणारी घटना घडली आहे. महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना तातडीच्या बैठकीसाठी बोलावले असताना सत्ताधारी मित्रपक्षाच्या दबावाखाली गटनेत्यांना दालनाबाहेर थांबण्यास सांगून त्यांचा अवमान केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महापौर दालनात नेमकं काय घडलं?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, महापौरांनी कोणतीही पूर्वकल्पना किंवा अजेंडा न देता सर्वपक्षीय गटनेत्यांना तातडीने बैठकीसाठी बोलावले होते. त्यानुसार ठाकरे गटाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर, मनसेचे यशवंत किल्लेदार, एमआयएमचे विजय उबाळे आणि समाजवादी पक्षाचे गटनेते महापौर दालनात पोहोचले. मात्र, त्याच वेळी उपमहापौर संजय घाडी आणि गटनेते अमेय घोले यांच्यासह शिवसेनेचे (सत्ताधारी गट) काही नगरसेवक तिथे आले.
थोड्या वेळ बाहेर थांबा, असं मुंबईच्या महापौर का म्हणाल्या?
अमेय घोले यांनी महापौरांना आम्हाला काही महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून उपस्थित इतर सर्वपक्षीय गटनेत्यांना थोड्या वेळ बाहेर थांबा असे सांगितले आश्चर्याची बाब म्हणजे, महापौरांनीही गटनेत्यांना थांबवून ठेवत केवळ सत्ताधारी नगरसेवकांशी चर्चा केली.
नेमकं काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
या प्रकाराने संतप्त झालेल्या किशोरी पेडणेकर यांनी हा मुद्दा लावून धरला. महापौरांच्या बोलावण्यावरून आम्ही बैठकीला गेलो होतो, पण तिथे आमचा 'इन्सल्ट' करण्यात आला. विरोधकांचा असा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनीही पेडणेकरांच्या सुरात सूर मिसळत या घटनेचा निषेध केला. विरोधकांचा अपमान करणे ही नवी परंपरा सुरू झाली असून, उपमहापौरांचाही वारंवार अपमान केला जात आहे, असे सांगत त्यांनी प्रशासनाचा निषेध केला.
सकाळपासून मानपमान नाट्य सुरूच
मुंबई महापालिकेत महायुतीतील मानापमान नाट्य सुरुच असून मानापमान नाट्याला पालिकेत पूर्णविराम नाहीच. प्रशासकीय कार्यक्रमात उपमहापौरांना दुय्यम स्थान मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपुजन झालेल्या सायन रुग्णालय इमारतीच्या कार्यक्रमावरुनही वाद झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महापालिकेच्या असलेल्या सायन रुग्णालयातील नव्या इमारतीचे भूमीपुजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमस्थळी महापौर वगळता पालिकेतील इतर समिती अध्यक्ष, नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला . तसंच, महापालिकेच्या रुग्णालयासंबंधी कार्यक्रम असूनही महापालिकेच्याच नेत्यांनाच सुरक्षारक्षकांकडून प्रवेश नाकारण्यात आला होता.
