पोलिसांच्या माहितीनुसार, 6 जानेवारी रोजी गेल्या वर्षी 36 वर्षीय चिराग धांडुकिया आणि त्यांचा पुतण्या हे दोघंही टू व्हिलरवरून सोन्याचे दागिने घेऊन जात होते. त्याची किंमत जवळपास 47.27 लाख रुपये इतकी होती. त्याच सोन्याची चोरट्यांनी चोरी केली आहे. यावेळी चार आरोपींनी त्यांची टू व्हिलर अडवून दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात चिराग यांच्या पुतण्याला दुखापत झाली आणि लगेचच आरोपी सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले.
advertisement
घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी चार आरोपींना तात्काळ अटक केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याचा एक साथीदार त्या वेळी फरार झाला होता. आता त्या चोरट्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस तपासात कैलास सूर्यवंशी ऊर्फ के. पी. हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. तो प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या टोळ्या तयार करीत असल्याचेही तपासात समोर आले. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या प्रकरणात मकोका लागू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी उपचारासाठी नेरळ येथे डॉक्टरांकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 6 जानेवारी रोजी नेरळमधील बाजारपेठ परिसरातून त्याला अटक करण्यात आली. अटकेदरम्यान आरोपीकडून सुमारे 12.91 लाख रुपयांचे चोरीला गेलेलं सोनं, एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कैलास सूर्यवंशीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि धुळे या जिल्ह्यांत एकूण 35 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये शोध मोहीम राबवली होती. उपआयुक्त पोलिस, झोन-1 यांच्याकडून एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आली होती. अखेर उपनिरीक्षक सूरज देवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करून त्याला अटक करण्यात यश आले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
