मुंबईत यंदाचा जानेवारी महिना गेल्या कित्येक वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक उष्ण राहिला. तरीही गेल्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. परंतु, आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढणार आहे. मुंबईतील गुरुवारचं तापमान 34.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. आता यामध्ये वाढ होऊन वीकेंडला ते 35 अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकतं. गुरुवारी ठाण्यात पारा 36 अंशांवर होता. अशातच मुंबईत शुक्रवार आणि शनिवारी तापमानात मोठी वाढ होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
दरम्यान, मुंबईतील तापमानाचा इतिहास पाहता 22 फेब्रुवारी 2012 रोजी सर्वाधिक 39.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं. परंतु, यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तापमान 35 अंशांवर गेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना यंदा उन्हाचे चटके सहन करावे लागण्याची चिन्हं आहेत.
किमान तापमानात वाढ
गेल्या काही काळात मुंबईत उत्तरेतील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत होता. त्यामुळे रात्री हवेत गारवा होता. आता या वाऱ्यांची दिशा बदलणार आहे. आता हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणार आहेत. त्यामुळे दिवसा तापमान 35 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. बुधवारी 17 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं. आता किमान तापमानात देखील वाढ होणार असून ते रात्री 21 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तरीही अद्याप मुंबईतील थंडी संपलेली नाही. पुढच्या आठवड्यात वेस्टर्न डिस्टर्बेस येण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे.