महालक्ष्मी येथे रेल्वे रुळांवरून उभारण्यात येणारा हा महापालिकेचा पहिलाच केबल आधारित उड्डाणपूल आहे. सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे. सध्या होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहनचालकांचा प्रवास सुसाट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
मुंबईत घर घेताय? सावधान! तुमची फसवणूक तर होत नाही ना? मालाडच्या प्रकाराने खळबळ
या पुलाच्या बांधकामाची पाहणी करताना अभिजित बांगर यांनी कामाच्या दर्जावर विशेष भर दिला. केबल-स्टेड पुलामधील ‘पायलॉन’ हा अत्यंत महत्त्वाचा व भार पेलणारा घटक असून त्यावर पुलाच्या डेकला आधार देणाऱ्या केबल्स ताणलेल्या असतात. त्यामुळे सुरक्षा गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि तांत्रिक तपासण्या काटेकोरपणे राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
या पुलाचा पायलॉन सुमारे 78.5 मीटर उंच असून पुलाची एकूण लांबी 803 मीटर आणि रुंदी 17.2 मीटर आहे. स्थानिक वॉर्ड कार्यालय आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पुलाचे सेगमेंट व लोखंडी साहित्य वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. शक्य तेथे एकाच वेळी दोन कामे समांतरपणे करण्याचे तसेच पावसाळ्यातही कामे सुरू राहतील असे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पुलाच्या रेल्वे हद्दीतील भागासाठी पश्चिम रेल्वे विभागाकडून विशेष ‘ब्लॉक’ची आवश्यकता आहे. रेल्वे विभागाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर उर्वरित स्पॅनचे काम हाती घेतले जाणार आहे. उच्च दर्जाचे काँक्रिट आणि मजबूत पोलादी घटकांचा वापर करून हा पूल वारा, भूकंप आणि वाहतुकीचा भार सहन करण्यास सक्षम बनवण्यात येत आहे.
पूल पूर्ण झाल्यानंतर महालक्ष्मी परिसरातील वाहतुकीचे चित्र पूर्णपणे बदलणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.






