Mumbai News: वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा, मुंबईतील ‘महालक्ष्मी’ परिसरात खास प्लॅन, डेडलाईन ठरली!
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील वाहतुकीचे चित्र पूर्णपणे बदलणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई: महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील दीर्घकाळापासूनची वाहतूककोंडी लवकरच इतिहासजमा होणार आहे. 31 ऑक्टोबरनंतर हा परिसर वाहतूककोंडीमुक्त होण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील केशवराव खाड्ये मार्गावर केबल-स्टेड उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू असून आतापर्यंत सुमारे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत पुलाचे सर्व काम पूर्ण होईल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महालक्ष्मी येथे रेल्वे रुळांवरून उभारण्यात येणारा हा महापालिकेचा पहिलाच केबल आधारित उड्डाणपूल आहे. सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे. सध्या होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहनचालकांचा प्रवास सुसाट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
या पुलाच्या बांधकामाची पाहणी करताना अभिजित बांगर यांनी कामाच्या दर्जावर विशेष भर दिला. केबल-स्टेड पुलामधील ‘पायलॉन’ हा अत्यंत महत्त्वाचा व भार पेलणारा घटक असून त्यावर पुलाच्या डेकला आधार देणाऱ्या केबल्स ताणलेल्या असतात. त्यामुळे सुरक्षा गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि तांत्रिक तपासण्या काटेकोरपणे राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
advertisement
या पुलाचा पायलॉन सुमारे 78.5 मीटर उंच असून पुलाची एकूण लांबी 803 मीटर आणि रुंदी 17.2 मीटर आहे. स्थानिक वॉर्ड कार्यालय आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पुलाचे सेगमेंट व लोखंडी साहित्य वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. शक्य तेथे एकाच वेळी दोन कामे समांतरपणे करण्याचे तसेच पावसाळ्यातही कामे सुरू राहतील असे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान, पुलाच्या रेल्वे हद्दीतील भागासाठी पश्चिम रेल्वे विभागाकडून विशेष ‘ब्लॉक’ची आवश्यकता आहे. रेल्वे विभागाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर उर्वरित स्पॅनचे काम हाती घेतले जाणार आहे. उच्च दर्जाचे काँक्रिट आणि मजबूत पोलादी घटकांचा वापर करून हा पूल वारा, भूकंप आणि वाहतुकीचा भार सहन करण्यास सक्षम बनवण्यात येत आहे.
पूल पूर्ण झाल्यानंतर महालक्ष्मी परिसरातील वाहतुकीचे चित्र पूर्णपणे बदलणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 9:08 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा, मुंबईतील ‘महालक्ष्मी’ परिसरात खास प्लॅन, डेडलाईन ठरली!










