मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी; ‘या’ दिवशी पुरवठा बंद राहणार, कारण काय?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Water Cut: मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई: ठाणे, मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना जानेवारी महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्ती तसेच जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व तांत्रिक देखभाल कामांमुळे विविध भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन संबंधित महापालिकांकडून करण्यात आले आहे.
मुंबई (मुलुंड व भांडुप परिसर)
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या मुलुंड व भांडुप परिसरात 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत तब्बल 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुलुंड पश्चिम व पूर्वेतील अमर नगर, जय शास्त्री नगर, पंचशील नगर, राहुल नगर, वीणा नगर, योगी हिल, मॉडेल टाऊन मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्गालगतचा परिसर, तसेच नाहूर गाव आणि भांडुपमधील खिंडीपाडा (लोअर व अप्पर) भागात निर्जळी राहणार आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
ठाणे शहरात पाणी बंद
ठाणे शहरातील किसन नगर आणि भटवाडी परिसरातील नागरिकांनाही या पाणीबंदीचा फटका बसणार आहे. मुंबई-ठाणे जलवाहिन्यांवरील दुरुस्ती कामांमुळे या भागांमध्ये 27 जानेवारी सकाळी 10 वाजल्यापासून पुढील 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे घरगुती वापरासह व्यावसायिक आस्थापनांनाही पाण्याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
advertisement
कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील मोहिली, बारावे, नेतीवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये मंगळवारी, 27 जानेवारी रोजी विद्युत व तांत्रिक देखभाल कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीत कल्याण, डोंबिवली व टिटवाळा परिसरात काही तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान या शटडाऊन काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि अनावश्यक वापर टाळावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 8:15 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी; ‘या’ दिवशी पुरवठा बंद राहणार, कारण काय?










