मुंबईतील महिला फसवणुकीच्या जाळ्यात
तक्रारदार महिला भांडुप परिसरात राहत असून तिचा स्वतःचा व्यवसाय आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिला जीएसटी संदर्भातील नोटीस आली होती. त्यामुळे जीएसटीची रक्कम भरण्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासू लागली. याबाबत तिने आपल्या एका मित्राशी चर्चा केली. त्या मित्राने तिला ललित हाथी याची ओळख करून दिली. ललित हा चारकोप परिसरात राहतो आणि तो कर्जावर पैसे देतो, असे तिला सांगण्यात आले होते.
advertisement
महिलेने ललितची भेट घेतल्यानंतर त्याने तिला 20 लाख रुपयांचे कर्ज देण्याचे मान्य केले. मात्र त्यासाठी तारण म्हणून सोन्याचे दागिने ठेवावे लागतील असे त्याने सांगितले. यावर विश्वास ठेवून महिलेने आपले 48 तोळे सोन्याचे दागिने त्याच्याकडे तारण ठेवले आणि त्याच्याकडून 20 लाख रुपये घेतले.
या कर्जावर महिलेने जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत दरमहा २५ हजार रुपये व्याज दिले. काही महिन्यांनंतर तिने कर्जाची संपूर्ण रक्कम परत करून आपले सोन्याचे दागिने मागितले. मात्र ललितने दागिने परत देण्यास टाळाटाळ केली. चौकशी केल्यानंतर ललितने तिचे सर्व सोन्याचे दागिने परस्पर विक्री केल्याचे उघड झाले. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
