सावत्र आईचा 'असा' घेतला सूड
मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या सावत्र आईवर तिच्याच मुलाने हल्ला केलेला आहे. सध्या बांगूरनगर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. अब्दुल रेहमान साबीर अन्सारी (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या सावत्र आई फातिमा मोहम्मद साकीर अन्सारी हिच्यावर जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या लोखंडी प्लेटने हल्ला केला होता.
advertisement
मनात एवढा राग का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुलच्या वडिलांनी फातिमाशी दुसरे लग्न केले होते. दुसरं लग्न केलं तर खरं पण लग्नाबाबत अब्दुलच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे त्याच्यात आणि सावत्र आईत नेहमीच वाद होत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान 3 मार्च रोजी अब्दुल फातिमाच्या घरी आला होता. त्या वेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या अब्दुलने जवळ असलेली जिमची प्लेट उचलून फातिमाच्या डोक्यात जोरात मारली. या हल्ल्यात फातिमा गंभीर जखमी झाली.
हल्ल्यानंतर अब्दुल घटनास्थळावरून पळून गेला आणि यानंतर बांगूरनगर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. विशेष पथकाने तपास करत अखेर 7 मार्च रोजी गोरेगाव परिसरातून त्याला अटक केली. अटकेनंतर आरोपीला बोरिवली येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
