राजू काकडे असं अटक केलेल्या ४५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तर ज्योती काकडे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी राजू आणि ज्योती यांच्यात मागील काही काळापासून कौटुंबीक वाद सुरू होता. याच रागातून ज्योती या आपल्या दोन मुलांसह नवी मुंबई परिसरातील कोरवे गावात राहायला आल्या होत्या. पत्नीने पुन्हा नांदायला यावं, यासाठी राजू मनधरणी करायला कोरगे इथं आला होता. पण दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर राजूने ज्योती यांच्यावर स्वयंपाक घरातील चाकूने सपासप वार केले. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती काकडे आणि तिचा पती राजू काकडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते. याच कारणामुळे ज्योती मागील काही महिन्यांपासून आपल्या दोन मुलांसह करावे येथे पतीपासून वेगळी राहत होती. याआधी हे कुटुंब पुण्यात राहत होते, परंतु वादांमुळे पत्नी नवी मुंबईला आली, तर पती राजू हा मूळगावी बुलडाणा जिल्ह्यातील देवळगाव येथे निघून गेला होता.
पण पत्नीला पुन्हा सोबत घेऊन जाण्यासाठी आणि तिची मनधरणी करण्यासाठी राजू काकडे दहा दिवसांपूर्वी बुलडाण्याहून करावे येथे आला होता. यासाठी त्याने तब्बल ८ ते ९ तासांचा प्रवास केला होता. नवी मुंबईत आल्यानंतर तो सातत्याने ज्योतीला गावाकडे सोबत चलण्याचा हट्ट करत होता. मात्र, त्यांच्यातील वाद काही केल्या मिटत नव्हता. रविवारी संध्याकाळच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. या वादातून संतापलेल्या पतीने चाकूने पत्नी ज्योतीच्या संपूर्ण शरीरावर अनेक वार केले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी तातडीने जखमी ज्योती काकडे यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. राजू काकडे याने कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.