मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून आतापर्यंत बाहेर असलेले नवाब मलिक यांची एंट्री झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते नवाब मलिकांकडे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी ही जबाबदारी मलिक यांच्यावर सोपवली आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.
अशी आहे मलिक यांची टीम
मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक- शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची तर निमंत्रित म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर - पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर - मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींचा समावेश आहे.
जेल, मलिक आणि भाजपचा विरोध
दरम्यान, नवाब मलिक यांच्या ईडीने कारवाई केली होती.नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दीड वर्षांनी, ११ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय जामीन मंजूर केला. त्यामुळे ते सुमारे दीड वर्ष तुरुंगात होते. ते जामिनावर बाहेर आले. याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर भाजप आणि मलिक असा सामना रंगला होता. महायुतीत सामील झाल्यानंतर मलिक यांच्या नावाला कायम भाजपकडून विरोध राहिला होता. आता मलिक यांनाच अजितदादांनी नवी जबाबदारी दिल्यामुळे भाजप काय भूमिका मांडणार हे पाहण्याचं ठरणार आहे.