शरद पवारांचा सरकारला टोला
शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत, त्यांच्याकडून कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक आहे, असे जे ऐकायला मिळते ते वास्तव आहे असे गोळीबाराच्या घटनेवरुन दिसते. अशा प्रकारच्या घटना व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची बघ्याची भूमिका असेल तर आज महाराष्ट्र कोणत्या दिशेला जात आहे त्याचं हे उदाहरण आहे. अशा गोष्टी घडणे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे, असं मत पवार यांनी मांडलं आहे.
advertisement
पोलीस ठाण्यात गोळीबार
भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता. या वादाबाबत दोन्ही पक्षांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. जिथे वाद सुरू असताना भाजप आमदाराने शिवसेना नेते महेश यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गोळीबारात महेश व्यतिरिक्त आणखी एक नेता राहुल पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर दोन्ही नेत्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.
3 जणांना अटक तिघांचा शोध सुरू
या गोळीबार प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. एकूण 10 राऊंड गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि अन्य दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 3 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित 3 आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आयपीसी आयओ कलम 307, 120 बी, 143, 147, 148, 149, 109, 323, 504 आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना कल्याणमध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती दिलीय. दरम्यान, या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर स्पष्टीकरणही दिलं होतं. पण अप्पर पोलीस आयुक्तांनी आमदारांच्या स्पष्टीकरणाचं खंडन केलं.
