'या' भागातील नागरिकांना मिळणार दिलासा
पुलाच्या कामासाठी साधारण 303 कोटी रुपये खर्च होणार असून कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. या नव्या पुलामुळे सायन, कुर्ला, धारावी, बीकेसी आणि कलिना या भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतुकीची कोंडी कमी होणार असून पावसाळ्यात मिठी नदीचा प्रवाहही सुरळीत राहील.
जुलै 2005 मध्ये आलेल्या अतिवृष्टीनंतर मिठी नदीचे पात्र वाढवण्याची गरज स्पष्ट झाली होती. त्यानंतर डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नदीचं पात्र 68 मीटरवरून 100 मीटरपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शीव-धारावी आणि वांद्रे परिसरातील पुलांची पुनर्बांधणी सुरू आहे. या पुलाचं बांधकाम दोन टप्प्यांत होणार असून धारावी परिसरातील हा पूल विशेष महत्त्वाचा आहे कारण याच मार्गाने बीकेसी, शीव आणि कलिना या भागांकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.
advertisement
सध्या या पुलाची रुंदी केवळ 9.3 मीटर आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी वारंवार होते. पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढल्यास पूल पाण्याखालीही जातो. त्यामुळे आता नवीन पुलाची रुंदी 48 मीटर आणि लांबी 108 मीटर असणार आहे. यामुळे वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होईल.
पूलाचे काम कधी संपेल?
मुंबई महापालिकेने या पुलाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षे पुलाची देखभालही कंत्राटदार कंपनीकडून केली जाईल. वाहतूक पोलिसांच्या समन्वयानेच हे काम पार पाडले जाणार आहे. जुन्या पुलाच्या बाजूलाच दक्षिणेकडे नवीन पूल उभारला जाईल आणि त्यानंतर जुना पूल पाडण्यात येईल. या नव्या पुलामुळे धारावी परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.