मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या माहितीनुसार, आरे ते बीकेसीदरम्यान मेट्रो-3 कॉरिडोर सेवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. याद्वारे आरे ते बीकेसी हे अंतर केवळ 22 मिनिटांत पार करणं शक्य होऊ शकतं. सध्या या प्रवासासाठी जवळपास पूर्ण 1 तास लागतो. मेट्रो आरे, सिप्ज, एम आय डी सी, मरोळ नाका, CSMIA T2 (एअरपोर्ट), सहार रोड, CSMIA डोमेस्टिक एअरपोर्ट, सांताक्रूझ, विद्यानगरी, बीकेसी ही स्थानकं गाठेल.
advertisement
आरे ते बीकेसीदरम्यानच्या सर्व स्थानकांचं काम आता पूर्ण होत आलंय. मेट्रो 3 ही कुलाबा ते आरेदरम्यान 33.5 किलोमीटरची मार्गिका आहे. त्यात पहिला टप्पा हा आरे कॉलनी ते बीकेसीदरम्यान 12.44 किलोमीटरचा आहे. या पहिल्या टप्प्यात दररोज मेट्रोच्या 96 फेऱ्या धावतील. सकाळी 6.30 वाजल्यापासून रात्री 10.30 वाजेपर्यंत प्रवाशांना मेट्रोनं प्रवास करता येईल.
प्रत्येक मार्गावर दर 6.30 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. कुलाबा ते आरेदरम्यान सर्व मार्गांवर सेवा सुरू झाल्यानंतर ही 6 मिनिटांची वेळ अवघ्या 3 मिनिटांवर येईल. पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी 10 ते 50 रुपये तिकीट दर असेल. संपूर्ण मार्गावरील प्रवासासाठी 70 रुपये मोजावे लागतील. 2025 पर्यंत या पूर्ण मार्गावरील सेवा सुरू करण्याच्या उद्देशानं काम सुरू आहे.