नाशिक-पुणे बससेवेचा ताण वाढला
दिवाळी सुरू होण्यापूर्वीच मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांमधील नोकरदार, विद्यार्थी आणि कामगार आपल्या मूळ गावी गेले होते. त्यावेळी धुळे, मालेगाव, जळगाव, सटाणा, साक्री, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील भागांकडे प्रवाशांची मोठी गर्दी होती. गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने अतिरिक्त बससेवा सुरू केली होती. मात्र त्या बसेसही प्रवाशांनी भरून निघत होत्या. नाशिक-पुणे मार्गावर तर सर्वाधिक गर्दी नेहमीच असते. या मार्गावर दररोज तब्बल 90 हून अधिक बसेस धावत असतात आणि त्यात विद्यार्थ्यांसोबत कामगारवर्गाची उपस्थिती लक्षणीय असते.
advertisement
अलीकडच्या काही वर्षांत पुण्यात शिक्षण घेणाऱ्या नाशिककर विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दर आठवड्याच्या शेवटी पुणे-नाशिक आणि नाशिक-पुणे बससेवेत विद्यार्थ्यांची नेहमीच मोठी गर्दी असते. विशेषतहा शनिवार-रविवारी सुट्टी संपल्यानंतर रविवारी सायंकाळी पुण्याकडे जाणाऱ्या बसेसमध्ये बसायला जागा मिळणे कठीण जाते. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने ही परिस्थिती आणखीन गंभीर झाली होती. प्रवाशांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन महामंडळाला जादा बसेस सोडाव्या लागल्या.
बसस्टँडवर अफाट गर्दी, प्रवाशांना नाहक त्रास
सध्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी महाविद्यालये आणि औद्योगिक क्षेत्रातील सुट्ट्या संपल्याने विद्यार्थी आणि कामगारवर्ग मोठ्या प्रमाणावर पुण्याकडे परतत आहेत. अनेक प्रवाशांनी आधीच गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आगाऊ आरक्षण करून ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इ-शिवाई आणि शिवनेरी या बससेवांचे 28 ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण पूर्ण झाले आहे. येत्या शनिवार आणि रविवारी प्रवाशांची संख्या आणखीन वाढेल अशी शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अतिरिक्त बसेस सोडण्याचे नियोजन केले असून प्रवाशांना मिळेल त्या बससेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
